पोलिसांनी कुशल होऊन तंत्रज्ञानाचा वापर करत गुन्हेगारी रोखावी : गृहमंत्री अनिल देशमुख

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   वाढती गुन्हेगारी तसेच गुन्ह्यांची वेगवेगळ्या पद्धती पाहता पोलिसांनी कुशल होऊन तंत्रज्ञानाचा वापर करत गुन्हेगारी रोखावी, अश्या सूचना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांना दिल्या आहेत. पुणे शहर व जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी आढवा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते.

शासकीय विश्रामगृह येथे शनिवारी सकाळी गृहमंत्र्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी पुण्याचे पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय शिंदे, पिंपरी चिंचवडे अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, पुणे ग्रामीण अधीक्षक संदीप पाटील आणि गुन्हे शाखचे उपायुक्त बच्चनसिंग, विशेष शाखेचे उपायुक्त मितेश घट्टे उपस्थित होते.

देशमुख यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. सध्या कोरोनामुळे निर्माण झालेली स्थिती, करत असलेल्या उपाययोजना याची माहिती घेतली. त्यानंतर नवीन तंत्रज्ञानाचा वापर जास्तीत जास्त करण्याच्या सूचना देखील त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तर पोलिसांचे आरोग्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना तसेच सध्याची स्थती याबाबत माहिती घेतली. अडीअडचणी जाणून घेत त्यांना सूचना दिल्या आहेत.

यावेळी पुणे शहर पोलिसांनी तडीपार गुंडासाठी तयार केलेल्या एक्स्ट्रा अॅपची माहिती दिली. पुणे शहरामधून तडीपार केलेल्या आरोपी त्याने पुन्हा शहरात येवुन गुन्हेगारी कृत्य करू नये, यासाठी हे अप तयार केले आहे. त्याच्या अंमलबजावणीची सुरूवात करण्यात आली आहे. यामुळे पोलिस यंत्रणेवरील ताण कमी होईल, अशी माहिती बच्चनसिंग यांनी गृहमंत्र्यांना दिली. पुणे ग्रामीणचे अधीक्षक संदीप पाटील यांनी “स्मार्ट पोलिसिंग” बाबत गृहमंत्र्यांना माहिती दिली.