संभाव्य गुन्ह्यांवर नियंत्रणासाठी पोलिसांनी गुन्हेगारांच्या तंत्राचा अभ्यास करावा : मुख्यमंत्री

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पोलिसांनी गुन्ह्यांची उकल करण्यासह गुन्हेगारांच्या तंत्राचा अभ्यास करावा तसेच गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यासाठी गुन्हेगारांच्या मानसिकतेचा बारकाईने अभ्यास केला पाहिजे, अशा सुचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहे. आज पोलीस मुख्यालयात राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची अर्धवार्षिक गुन्हे आढावा परिषद झाली, त्यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. दहशतवाद आणि नक्षलवाद्यांशी लढा देण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी आणखी कठोर तयारी करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.

गुन्ह्यांच्या स्वरुपात आणि गुन्हेगारांमध्ये खूप बदल झाला आहे. पोलीस दलामध्ये ज्या प्रमाणे उच्चशिक्षित, तंत्रशिक्षित येत आहेत. त्याच प्रमाणे गुन्हेगार, नक्षलवादी देखील सुशिक्षित असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी गुन्हेगारांच्या तंत्राचा, मानसिकतेचा अभ्यास करून तपास पद्धतीत वारंवार सुधारणा करत राहिले पाहिजे. दहशतवादी कारवायांचा सामना करायचा असेल तर यासंबंधीचे शिक्षण शालेय पातळीपासूनच द्यावे लागेल असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

पोलिसांनी नि:स्वार्थी, नि:स्पृहपणे काम करून त्यांच्याकडे येणाऱ्या सर्वसामान्यांच्या मनात विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. राज्य पोलीस दलात आवश्यक सायबर लॅब, फॉरेन्सिक लॅब, आधुनिक तपास सामग्री दिली जाईल. पोलिसांच्या घराचे प्रश्न मार्गी लावले जातील. विभागाला निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली.

पोलीस गृहप्रकल्प वेळेत पूर्ण झाले पाहिजेत – अजित पवार
पोलिसांतील माणसाच्या मागे राज्य शासन खंबीरपणे उभे असल्याचे सांगत अजित पवार म्हणाले, पोलिसांसाठी मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याकडे लक्ष देण्यात येईल. पोलीस गृहप्रकल्पांसाठी राज्यशासन आवश्यक ती तरतूद करेल. मात्र, केंद्राकडून अधिक निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा केला जावा. पोलिसांच्या गृहप्रकल्पांची कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण झाली पाहिजेत असे अजित पवार म्हणाले.

ड्रोनचा सामना करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करा- गृहमंत्री
जगभरात ड्रोन हल्ल्याच्या घटना घडत असल्याचे दिसून येते. हे एक नवीन आव्हान समोर आहे. याचा सामना करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करुन कार्यान्वितकरण्याची गरज आहे. पोलीस खात्यात अर्टिफिशल इंटेलिजन्सचा वापर कसा करता येईल याचा विचार व्हावा असे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.

यावेळी गृहराज्यमंत्री (शहरे) सतेज पाटील, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराजे देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी केले. यावेळी मुख्य सचिव अजोय मेहता, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे, पोलीस गृहनिर्माण व पोलीस कल्याण आदींचे महासंचालक बिपीन बिहारी, राज्यातील शहरांचे पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक उपस्थित होते.

फेसबुक पेज लाईक करा –