… अन् लेले आजोबासाठी पोलीस ठाणे बनले दुसरे घर, घरात एकट्या राहणार्‍या वृध्दांना पोलिसांचा ‘आधार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबईत एकटे राहणारे ज्येष्ठ नागरिक तसेच वृद्ध आजी आजोबांची माहिती पोलिसांकडे नोंद आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याअंतर्गत त्यांच्या भागातील ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी मुंबई पोलीस धावून जाताना दिसत आहे. अशा वृध्द नागरिकांना रेशनिंगपासून गॅस, वीजबील, औषध आणून दिले जात आहे. त्यामुळे त्यांच्यातील नाळ अधिक घट्ट होताना दिसत आहे. विलेपार्लेतील 83 वर्षीय लेले आजोबासाठी, तर पोलीस ठाणे दुसरे घरच बनले आहे.

विलेपार्ले पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र काणे म्हणाले की, 2005 मध्ये लेले आजोबांसोबत ओळख झाली. घरात एकटे असल्याने पोलिसांसोबत गप्पा मारणे हा त्यांचा दिनक्रमच. अशात कधी त्यांची बोलण्याची इच्छा झाली की मी घरी जातो. किंवा त्यांना पोलीस ठाण्यात घेउन येण्यासाठी गाडी पाठवितो. तास, दोन तास त्यांच्या गप्पांमध्ये जातात आणि ते आता माझ्या वडिलांसारखेच झाल्याचे त्यांनी सांगितले.

पोलीस निरीक्षक काणे यांनी नववर्षानिमित्त कोपरा बैठका घेण्याचा उपक्रम सुरु केला आहे. त्यांच्या या उपक्रमाला प्रतिसादही मिळत आहे. बैठकीअंतर्गत ते ज्येष्ठ नागरिकांची होणारी फसवणूक आणि महिला संबंधित अत्याचारावर विशेष जनजागृती करत आहेत. यात गुन्हा कसा घडतो? त्यावर कशा पद्धतीने नियंत्रण आणता येईल याबाबत मार्गदर्शन करत आहेत. आता पर्यंत एकूण 73 बैठका पार पडल्या आहेत.