राज्यातील पोलिसांवरच असणार आता ‘वॉच’, गृहमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेलेल्या तक्रारदारांना बऱ्याचवेळा निराश होऊन परतावे लागते. मात्र, आता तक्रारदारांना पोलीस ठाण्यातून निराश होऊन परतावे लागणार नाही. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या तीन महिन्यांमध्ये राज्यातील सर्व 1150 पोलीस स्टेशनमध्ये प्रत्येकी सहा कॅमेरे लावण्यात येणार असून हे कॅमेरे पोलिसांच्या मध्यवर्ती कंट्रोल रुमला जोडले जाणार असल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली.

पोलीस स्टेशनमध्ये लावण्यात आलेले कॅमेरे मध्यवर्ती कंट्रोल रुमला जोडले जाऊन त्याच्या फिडचे रेकॉर्डिंग देखील होणार आहे. हे कॅमेरे लोकांना गेटमधून आत जाताना, एफआयआर नोंदवण्याच्या ठिकाणी, कॉरिडॉरमध्ये आणि लॉकअपमध्ये लावण्यात येणार आहेत. पोलीस स्टेशनच्या चेंजिंग रुम सोडले तर सर्व ठिकाणी कॅमेऱ्याची नजर असणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. पोलिसांकडून तक्रार घेतली जात नाही ही तक्रार जुनी असल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र, नव्याने सुरु झालेल्या सीसीटीएनएस प्रणालीमध्ये लोकांना ऑनलाइन तक्रार करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

नव्या इमारतींना सीसीटीव्ही अनिवार्य
राज्यातील नव्या इमारतींमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे अनिवार्य करण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधान परिषदेत दिली. इमारतींना बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे गृहविभागाच्या सीसीटीएनएस या प्रणालीशी जोडले जातील असेही त्यांनी सांगितले. तसेच मुंबईत आणखी पाच हजार कॅमेरे नेटवर्कशी जोडण्यात येतील, असेही देशमुख यांनी सांगितले.