चोरट्यांची भन्नाट युक्ती ; चोरलेल्या गाड्यांवर लावले ‘पोलीस’ स्टिकर

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन  – पोलीस कर्मचारी आपल्या गाडीवर आपल्याला पोलिसांनी कारवाई करु नये, यासाठी पोलीस असल्याचा स्टिकर लावतात. अनेकदा तो ट्रॉफिक पोलिसांचाच असतो.पोलीसही अशा गाड्यांकडे दुर्लक्ष करतात. वाहतूक पोलिसांची हीच वृत्ती लक्षात घेऊन चोरट्यांनी चोरलेल्या मोटारसायकलवर पोलीस असा स्टिकर लावायचे आणि नंतर तीच गाडी आपल्या कोणत्याही कामासाठी वापरायचे असे ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या विविध पथकांनी अटक केलेल्या आरोपींकडून उघड झाले आहे.

‘पोलीस’ असे स्टिकर लावल्याने चोरीच्या या गाड्यांकडे व त्यावरील चालकाकडे पोलिसांचे दुर्लक्ष होते. त्यामुळे इतके दिवस या चोरट्यांचा चोरीचा मामला बिदक्कत सुरु राहिला होता.

भाजप नगरसेवकाने महिला अधिकाऱ्यास पाठविले अश्लील संदेश, नगरसेवक फरार 

ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने गेल्या महिन्याभरात वाहनचोरांविरुद्ध मोठी मोहीम हाती घेतली होती. त्यात १५६ चोरट्यांना अटक करुन त्यांच्याकडून तब्बल अडीचशेहून अधिक वाहने हस्तगत करण्यात आली होती. या आरोपींकडे केलेल्या चौकशीत ही बाब समोर आली आहे. एखाद्या अपघातामध्ये वाहनाचे पूर्णपणे नुकसान झाल्यानंतर गाडीच्या नुकसानीचा क्लेम संबंधित वाहनधारकाने केल्यानंतर तिची संपूर्ण नुकसानभरपाई विमा कंपनीकडून दिली जाते. त्यानंतर, लिलावामध्ये ही गाडी एखाद्या एजंटकडून खरेदी केली जाते. याच गाडीची चेसिस काढून ती चोरीच्या गाडीला लावली जाते. इंजीनचा क्रमांक ग्राइंडरने खोडून टाकला जातो. अशा प्रकारे चोरीची गाडी रस्त्यावर आणली जाते.

हसन जाफरी, शमीम अन्सारी आणि सन्नान खान या मुंब्य्रातील टोळीकडून अनेक वाहनांची चोरी उघड झाली आहे. चारचाकी वाहने चोरून नेण्यात ही टोळी माहीर असल्याचे उघड झाले आहे. सुरेंद्र सोंडकर (भिवंडी), सागर पुवरा (भिवंडी) आणि साकीब अन्सारी (पडघा) या अन्य एका दुचाकी चोरणाऱ्या टोळीलाही अशाच प्रकारे सापळा लावून गुन्हे अन्वेषण विभागाच्या मालमत्ता कक्षाच्या पथकाने अटक केली आहे. साकीब हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यानेही आतापर्यंत अनेक गाड्या चोरल्याचे उघड झाले आहे. साकीबसारख्या अनेक छोट्या टोळ्यांना जेरबंद करण्यात आले असून आतापर्यंत १५६ आरोपींना अटक केली आहे.