पोलिसांनी इशारा करताच दुचाकीस्वाराची उडाली ‘भंबेरी’; पळ काढल्यानंतर पोलिसांनी पकडलं, आढळले 440 हिरे

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   दुचाकीवरून हिऱ्यांची तस्करी करणाऱ्या दोघांना छत्तीसगड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे 440 हिरे जप्त केले असून त्याची किंमत सुमारे 50 लाख असल्याचे सांगितले जात आहे. एकाच वेळी 440 हिरे सापडण्याची छत्तीसगडमधील ही पहिलीच वेळ आहे. चोरटे स्कूटीवरून हे हिरे छत्तीसगडमधील फिंगेश्वरमार्गे रायपूरला घेऊन जात होते. त्यांच्याकडील मोबाईल कॉल्सची माहिती तपासली जात आहे. आता हे तस्कर कुणाकडून हे हिरे खरेदी केले होते आणि रायपूरमध्ये कुणाला विकायला जात होते, याचा पोलीस तपास करत आहेत.

प्राप्त माहितीनुसार, दुचाकीवरून जाणा-या दोघांना पोलिसांनी वाटेत रोखल्यावर ते घाबरले अन् पळ काढला. दरम्यान, पोलिसांनी त्यांना पकडून तपासणी केली असता त्यांच्याकडे तब्बल 440 हिरे सापडले. एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात हिरे सापडण्याची ही छत्तीसगडमधील पहिलीच वेळ आहे. यापूर्वी गरियाबंद जिल्हा पोलिसांनी गेल्या दीड वर्षांत 7 विविध ठिकाणांवरून 672 हिरे जप्त केले होते. आतापर्यंत दीड कोटी मूल्याचे तब्बल 1100 नग हिरे पोलिसांनी जप्त केले आहेत. गरियाबंद जिल्ह्यातील मैनपुरी परिसरात पायलीखंड नावाची हिऱ्याची खाण आहे. त्याठिकाणी दररोज अवैध खोदकाम करून हिरे काढले जातात. अवैध खाणकाम करणाऱ्यांकडून हे हिरे कमी किमतीत खरेदी करून त्याची मोठ्या शहरांमध्ये विक्री केली जाते. मात्र यावेळी जेवढ्या मोठ्या प्रमाणात हिरे जप्त झाले आहेत. ते पाहून यात काही बढ्या लोकांचा हात असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.