माओवाद्यांच्या हल्ल्यात पोलीस उपनिरीक्षकासह एक कॉन्स्टेबल शहीद

गडचिरोली :  वृत्तसंस्था –   भामरागड तालुक्यातील घनदाट जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबारात सी 60 कमांडो पथकातील पोलीस उपनिरीक्षकासह एक कॉन्स्टेबल शहीद झाले आहेत. तर तीन जवान जखमी झाले आहेत. भामरागड तालुक्यातील कियरकोटीच्या जंगलात माओवादी आणि पोलीस यांच्यामध्ये चकमक झाली. मागील 15 दिवसांत माओवाद्यांकडून झालेला हा दुसरा हल्ला आहे.

माओवाद्यांच्या विरोधात सुरु असलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये सी 60 कमांडो जवान रविवारी सकाळी फसले होते. माओवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने अंदाधूंद गोळीबार केला. पोलिसांनी माओवाद्यांना जोरदार प्रतिउत्तर दिलं. मात्र, पोलीस उपनिरीक्षक धनाजी व्हनमाने आणि जवान किशोर आत्राम या दोघांना विरमरण आले.

या हल्ल्यात तीन जण गंभीर जखमी झाले. गोंगूल ओक्सा, राजू पुसली आणि दसरू कुरचामी असे जखमी झालेल्या जवानांची नावे आहेत. कुरचामी यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजतेय. जखमी जवानांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शहीद जवानांचे पार्थिव दुपारी दोनच्या सुमारास हेलिकॉप्टरने गडचिरोली येथे आणण्यात आले.

शहीद धनाजी होनमाने हे पंढरपूर तालुक्यातील पुलूज येथील मुळ रहिवासी असल्याची माहिती आहे. ते साडेतीन वर्षापासून भामरागड येथील शीघ्र कृती दलात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. शहीद किशोर आत्राम हे भामरागड तालुक्यातील आरेवाडा येथील रहिवासी आहेत. दरम्यान दोन दिवसांपूर्वी छत्तीसगडमध्ये माओवाद्यांच्या घातपाताचा मोठा कट सुरक्षा जवानांनी उधळून लावला होता.