पोलिस उपनिरीक्षकासह तिघे निलंबित

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाईन – पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाच्या कारवाईनंतर जुगार आड्डा सुरु राहिल्याचा ठपका ठेवून खेड पोलीस ठाण्यातील तिघांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये पोलीस उपनिरीक्षकासह सहायक पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस हवालदाराचा समावेश आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे केली असून त्यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

पोलिस उपनिरीक्षक समर्थ बेग, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सत्यवान मयेकर आणि पोलिस हवालदार संजय मारळकर असे निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहत. जिल्ह्यात बेकायदेशीर जुगार अड्ड्यांना आशीर्वाद देणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी दिलेला हा इशारा आहे.

जिल्ह्यात अवैध जुगार अड्डे बंद करण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी कंबर कसली आहे. त्यासाठी त्यांनी स्वतंत्र पथकाची स्थापना केली. पोलीस निरीक्षक किंवा उपनिरीक्षकांना आदेश देऊनही ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये जुगार आड्डे सुरू आहेत, तेथे या पथकाकडून कारवाई करून पोलीस ठाण्याला इशारा दिला जातो. त्यानंतर संबंधित पोलीस ठाण्याने अवैध व्यवसाय सुरू ठेवता कामा नयेत, हा त्याचा उद्देश आहे.

खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भरणेनाका हा भाग सुमारे १ किमी अंतरावर आहे. येथे मोठ्या प्रमाणात जुगार अड्डे सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलीस अधीक्षकांच्या पथकाने एकदा नाही, तर दोन वेळा धाड टाकून कारवाई केली होती. तरीही पुन्हा हा अड्डा सुरू असल्याचे दिसून आल्याने खेड पोलिस ठाण्यातील तीन पोलिसांवर याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
खेड भरणेनाका येथील जुगार अड्ड्यावर दोनवेळा छापे टाकूनही तो पुन्हा सुरू होता. कर्तव्यात कसूर केल्याने त्यांचे निलंबन केले असल्याचे रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी सांगितले.