लाचेची मागणी करणाऱ्या पोलीस उप निरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

अकोला : पोलीसनामा ऑनलाईन-मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षकाच्या रायटरने दहा हजारांची लाच मागितल्या प्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक, रायटर आणि एका अनोळखी पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस उप निरीक्षक शैलेश सुरेश म्हस्के, रायटर शेंडे आणि एक अनोळखी पोलीस कर्मचारी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी ४२ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार दिली होती.

फिर्यादी याच्यावर मोबाइल चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी सिटी कोतवाली ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक म्हस्के, त्यांचा रायटर शेंडे यांनी १० हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंध विभागकडे केली होती. फिर्यादीच्या तक्रारीवरुन पथकाने २२ नोव्हेबर रोजी पडताळणी करीता सरकारी पंचासह पाठवले असता पंचा समक्ष  दोघांनी १० हजार रुपयाची मागणी केली. पडताळणी दरम्यान आरोपींना फिर्यादी यांचा संशय आला. शर्टाच्या  खिशात मोबाईलवर रेकॉर्डिंग करीत असल्याचा संशय आल्याने आरोपींनी फिर्यादीला तू रेकॉर्डिंग करतोस काय? असे विचारून त्यांची अंगझडती घेतली. झडती घेत असताना अनोळखी पोलीस कर्मचाऱ्याने तांत्रिक पुराव्याशी छेडछाड केली. तसेच फिर्यादीस शिवीगाळ केली. पडताळणीमध्ये आरोपींनी लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाल्याने तिघांवर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई अमरावती परिक्षेत्राचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक डोंगरदिवे, अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक संजय गोर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ईश्वर चव्हाण, पोलीस हवालदार गजानन दामोदर यांनी केली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधावा.