Pandharpur News : विनयभंग प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकला 6 महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी मंगळवेढा पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस उपनिरीक्षकास मंगळवेढा न्यायालयाने ठोठावलेली शिक्षा अपीलात पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने कायम ठेवली आहे. त्यानुसार 6 महिने सतक्तमजुरी आणि 10 हजाराचा दंड व पिडीत मुलीस 5 हजाराची नुकसान भरपाई देण्याची शिक्षा सुनावली आहे. पंढरपूरचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. के. मोरे यांनी आरोपी पोलिस उपनिरीक्षकाचे अपील फेटाळले आहे.

अंबादास हरीबा यादव असे शिक्षा सुनावलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पिडीत मुलीला एका तरुणाने पळवून नेले होते. याप्रकरणी मुलीच्या आईने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपास करून मुलीला अकलूज येथून शोधून मंगळवेढा पोलिस ठाण्यात आणले होते. त्यावेळी तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक यादव याने पोलिस ठाण्यातच मुलीचा विनयभंग केला होता. या प्रकरणी मंगळवेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन घेतला नव्हता. त्यामुळे पिडितेने मंगळवेढा न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर कोर्टाच्या आदेशानुसार मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.

याप्रकरणी मंगळवेढा न्यायालयात फौजदारी खटलाची सुनावणी घेवून आरोपीला 6 महिने सतक्तमजुरी व 10 हजार दंड व पिडीत मुलीस 5 हजार नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला होता. या शिक्षेविरोधात आरोपीने पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालयात अपील केले होते. अपीलाची सुनावणी घेवून जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. के. मोरे यांनी मंगळवेढा न्यायालयाचा निकाल कायम ठेवला आहे. यात सरकारतर्फे अ‍ॅड. सारंग वांगीकर यांनी काम पाहिले आहे.