खबळजनक ! विधानसभेच्या गेटसमोरच पोलीस अधिकाऱ्याची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

लखनौ : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील लखनौ येथे विधानसभेच्या गेटसमोरच एका पोलीस उपनिरीक्षकाने स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. निर्मल चौबे असे आत्महत्या करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव सांगण्यात येत आहे. चौबे यांनी शासकीय बंदुकीतुन गेट नंबर 7 च्या समोर स्वत:वर गोळी झाडली. यामध्ये गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निर्मल चौबे हे 1987-88 बॅचमधील उपनिरीक्षक आहेत. बंथरा पोलीस ठाण्याचा चार्ज त्यांना देण्यात आला होता. विधानसभा अधिवेशनावेळी त्यांची ड्युटी त्या परिसरात लावण्यात आली होती. त्यामुळे ते विधानसभेच्या गेट नंबर 7 व बंदोस्तासाठी तैनात होते. एका हिंदी वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, आत्महत्या करणारा पोलीस उपनिरीक्षक हा तणावाखाली होता. त्यामुळेच ऑन ड्युटी आत्महत्या करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

ज्यावेळी चौबे यांनी स्वत:वर गोळी झाडली त्यावेळी परिसरात एकच खळबळ उडाली. विधानसभेच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांना या घटनेमुळे धक्का बसला. गोळीच्या आवाजाने उपस्थित लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला. त्यानंतर गेट नंबर 7 समोर असलेल्या पार्किंगमध्ये चौबे यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले. त्यावेळी तैनात असलेल्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली त्यावेळी चौबे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले.

सहाय्यक पोलीस आयुक्त नवीन अरोडा यांनी सांगितले की, मृत पोलीस अधिकारी आजारामुळे त्रस्त होते. त्यांच्याकडे सुसाईड नोट आढळली. त्यात लिहिलं होतं की, मुख्यमंत्री साहेब माझ्या मुलाची काळजी घ्या, मी आजाराने त्रस्त झालो आहे, मी जात आहे. अशी माहिती अरोडा यांनी दिली.