Pune / Pimpri : तक्रारदार तरुणीचे ॲपल कंपनीचे घड्याळ चोरणारा पोलिस उपनिरीक्षक तडकाफडकी निलंबीत

पिंपरी/पुणे : ऑनलाइन टीम – बेपत्ता भावाची तक्रार देण्यासाठी गेलेल्या तरुणीला घरी सोडण्याच्या बहाण्याने घरी येऊन घरातून ॲपल कंपनीचे महागडे घड्याळ चोरल्या प्रकरणी फौजदाराला आयुक्तांनी तकाडफडकी निलंबित केले आहे. प्रशांत राजेंद्र रेळेकर असे निलंबित करण्यात आलेल्या फौदाराचे नाव असून ते हिंजवडी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

याप्रकरणी 25 वर्षीय तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार तरुणीचा भाऊ बेपत्ता झाला आहे. भाऊ बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यासाठी तरुणी 24 एप्रिल रोजी रात्री हिंजवडी पोलीस ठाण्यात गेली होती. त्यावेळी तक्रारदार तरुणीची तक्रार घेतल्यानंतर प्रशांत रेळेकर हे तरुणीला घरी सोडण्याच्या बहाण्याने तिच्या घरी गेले. घरी सोडायला जाताना रेळेकर यांनी तरुणीसोबत लगट करण्याचा प्रयत्न केला. आपण कधीही हॉटेलवर जाऊ शकतो, मी तुमच्यासाठी कोणतेही हॉटेल उघडायला सांगेन. मी उद्या मिरजेला जात आहे. तू पण मझ्यासोबत चल असे म्हणून लगट करण्याचा प्रयत्न केला. यावेळी घाबरलेल्या तरुणीने रेळेकर यांना नकार दिला.

तरणीचे घरी पोहचल्यानंतर रेळेकर यांनी आपण खूप थकलो आहोत, असे सांगून तिच्याकडे चहाची मागणी केली. तरुणीने नाईलाजाने त्यांना घरात घेतले. त्यावेळी घरात तरुणीची आई होती. चहा पिताना रेळेकर यांनी चार्जिंगला लावलेले अॅपल कंपनीचे महागडे घड्याळ खिशात घातले. दुसऱ्या दिवशी तरुणीने पोलीस ठाण्यात जाऊन हा सर्व प्रकार वरिष्ठांच्या कानावर घातला. वरिष्ठांनी रेळेकर यांची झडाझडती घेतल्यानंतर त्यांनी अॅपल कंपनीचे महागडे घड्याळ तरुणीला माघारी केले. प्रशांत रेळेकर यांच्या वागणुकीमुळे खात्याची प्रतिमा मलीन झाली आहे, असा ठपका ठेवत आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी रेळेकर यांना निलंबित करण्याचे आदेश काढले.

या प्रकरणासंदर्भात बोलताना आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले, सामान्य नागरिकांना त्रास होईल अशी कोणतीही गोष्ट कोण करत असेल तर त्याची गय करणार नाही. सर्वत्र असे प्रकार घडत असतात. पण, पोलिसांची अब्रु वेशीला टांगली जाईल यामुळे अशी प्रकरणे दाबली जातात. मात्र माझ्याकडे अशा चुकीला माफी नाही. मी कोणाचीही गय करणार नाही किंवा कोणालाही पाठीशी घालणार नाही.