दुसरा घरोबा करणाऱ्या PSI चे पोलीस विभागाकडून निलंबन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – लग्नानंतरही दुसरा घरोबा करणे एका पोलीस उपनिरीक्षकाला चांगलेच महागात पडले आहे. खात्याची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका ठेवत त्याला निलंबितही केले आहे. संबंधित उपनिरीक्षकाला निलंबित करण्याचे आदेश अपर पोलिस आयुक्त एन. डी. चव्हाण यांनी दिले आहेत

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, निलंबित पोलिस उपनिरीक्षक हडपसर पोलिस ठाण्यात कार्यरत होता. लग्न झालेले असतानाही त्याचे नवी पेठेतील एका मुलीशी ओळख झाल्यानंतर प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यातूनच तो डिसेंबर 2019 पासून संबंधित तरुणीसोबत लिव्ह इनमध्ये राहत होता. या दरम्यान त्याने तिला गर्भपात करायला भाग पाडले. मात्र काही कारणातून त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर त्याने त्या तरुणीला लग्न करण्यास नकार दिला. तरुणीने पोलिस आयुक्तालयातील भरोसा सेलकडील महिला सहायता कक्षाकडे धाव घेऊन तक्रार दिली. या ठिकाणी दोघांचे समुपदेशन करण्यात आले. त्यावेळी तरुणीने महिला दक्षता समितीच्या सदस्यांसमोर नंतर कोणतीही तक्रार नसल्याचे लिहून दिले. मात्र, पोलिस दलात अधिकारी अन् विवाहीत असूनही एखाद्या मुलीसोबत प्रेमसंबंध ठेवणे, तिच्यासोबत लिव्हइनमध्ये राहणे, तिला गर्भपात करायला भाग पाडणे हे पदास अशोभनीय आहे. तसेच पोलिस दलाच्या प्रतिमेला बाधा आणणारे आहेत. यामुळे पोलिस खात्याची प्रतिमा मलीन झाल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवत या वर्तनाबद्दल त्या पोलिस उपनिरीक्षकाला निलंबित केले आहे.