सोलापूरच्या ‘उपमहापौर’ला मदत करणे पडले महागात… सांगवीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ‘कंट्रोल’ला सलग्न तर उपनिरीक्षक निलंबीत

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – फसवणुकीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतलेल्या सोलापूर महापालिकेच्या उपमहापौर राजेश काळे यांना पोलिसांनी सोडून दिले. यानंतर या प्रकरणाची खातेअंतर्गत चौकशी करण्यात आली व पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी सांगवीच्या दोन अधिकाऱ्यांवर मंगळवारी रात्री कारवाईचा बडगा उचलला आहे. वरिष्ठ निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांना कंट्रोलला सलग्न करण्यात आले तर उपनिरीक्षक रविंद्र पन्हाळे यांना निलंबीत करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की; सांगवी परिसरात एकच जमीन अनेकांना विक्री करुन फसवणूकण केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये सोलापूर महापालिकेचे उपमहापौर राजेश काळे आणि त्यांच्या साथीदारांची नावे आहेत. या प्रकरणाचा तपास करताना सांगवी पोलिसांनी काळे यांना सोलापूर येथून ताब्यात घेतले. शुक्रवारी रात्री पुण्यात, सांगवी येथे आणले.

शनिवारी काळे यांना सांगवी पोलिसांनी सोडून दिले. याबाबत विचारणा केली असता सध्या कोरोनाची साथ आहे, त्यातच काळे हे खोकत होते, थंडी, ताप असल्याचे सांगत होते, त्यामुळे त्यांना सोडण्यात आले. शिंका आणि खोकला येत असल्याने वैद्यकीय तपासणी करून नोटीस बजावत सोडण्यात आले. याबाबत मीडियामध्ये बातम्या आल्या. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली आणि खातेअंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली.

स्वतःच्या कामात कसुरु केल्याचा ठपका लावत पोलीस आयुक्त बिष्णोई यांनी निरीक्षक साबळे यांना कंट्रोल ला सलग्न तर उपनिरीक्षक रविंद्र पन्हाळे यांना सेवेतून निलंबीत केले आहे.