मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ‘माथेफिरु’ पोलीस निलंबित (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पोलीस पत्नीच्या निर्घुण खुनाच्या गुन्ह्यातून सबळ पुराव्या अभावी सुटलेल्या माथेफेरु पोलिसाने शेजाऱ्याच्या डोक्यात दगड घालून त्यांना गंभीर जखमी केले. चंदननगर पोलिसांनी त्याला अटक केली. न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केल्यानंतर तो दुसऱ्या दिवशी पुन्हा वडगाव शेरी येऊन शिवीगाळ करण्याचा प्रकार केला. याप्रकरणी पोलीस श्रेयस विनोद साळवी (वय ३८, रा. विश्रांतवाडी) याला पोलीस उपायुक्तांनी निलंबित केले आहे.

याबाबतची माहिती अशी, पोलीस कर्मचारी श्रेयस साळवी याची कैद्यांची कोर्टात ने-आण करणाऱ्या पोलीस पार्टीमध्ये नेमणूक केली आहे. त्याचे सासरे बाळकृष्ण विभुते आणि संदीप रसाळ (रा. वडगाव शेरी) हे एकमेकांशेजारी राहतात. त्यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. त्यावेळी दोघांनीही एकमेकांविरुद्ध पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. विभुते यांचा जावई पोलीस कर्मचारी श्रेयस साळवी हा मंगळवारी रात्री रसाळ यांच्या घरी आला. त्याने रसाळ यांच्या सीमाभिंतीवरुन उडी मारुन आत प्रवेश केला. तेव्हा घरातील लोकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन माहिती दिली. तोपर्यंत साळवी याने रसाळ यांच्या डोक्यात वीट मारुन त्यांना गंभीर जखमी केले होते. कुटुंबियांच्या आरडाओरडामुळे शेजारील तरुणांनी साळवी याला पकडून पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी त्याला अटक करुन न्यायालयात हजर केले. तेथे त्याला जामीन मिळाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तो पुन्हा वडगाव शेरीला येऊन तो रसाळ यांना दमदाटी करु लागला. तेव्हा पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले.

रसाळ यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्याची एकच चर्चा सुरु झाली. गेल्या एक महिन्यांपासून साळवी कामावर हजर नव्हता. जामीनावर सुटल्यानंतर पुन्हा धमकाविल्याप्रकरणी पोलीस उपायुक्तांनी साळवी याला निलंबित करण्यात आले आहे.

श्रेयस साळवी याने महिला पोलीस शिपाई रुपाली साळवी हिचा ऑक्टोबर २०१३ मध्ये निर्घुण खुन केला होता. साळवे याने चोरुन दुसरे लग्न केले होते. ही बाब दुसऱ्या पत्नीला समजल्यावर त्यांच्यात वाद होत होते. त्यावरुन त्याने दुसऱ्या पत्नीचा खुन केला होता. या खटल्यातून त्याला न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी मे २०१६ मध्ये निर्दोष सुटका केली होती. त्यानंतर त्याला पुन्हा पोलीस दलात सामावून घेतले होते.

Visit : Policenama.com