धक्कादायक ! पोलिस भरतीत मदतीच्या आमिषाने 2 मुलींचा विनयभंग; पोलिस कर्मचारी निलंबित

नागपूर : पोलिस भरतीत मदतीच्या आमिषाने नागपूर शहर पोलिस दलातील एका कर्मचाऱ्याने दोन सख्ख्या बहिणींचा विनयभंग केला. या पोलिस कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. तसेच पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी त्याच्या निलंबनाची कारवाई केली आहे.

रवी तिवारी असे या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. तो पोलिस मुख्यालयात कार्यरत आहे. पोलिस भरतीच्या निमित्ताने या पोलिस कर्मचाऱ्याची ओळख 17 आणि 15 वर्षांच्या मुलींशी झाली. भरती होण्यासाठी लागणाऱ्या प्रशिक्षणासाठी या दोन्ही बहिणींना मदतीचे आमिष या पोलिस कर्मचाऱ्याने दाखवले. तसेच जेव्हा त्या मुली त्याच्याकडे यायच्या त्यावेळी तो त्यांच्याकडे एकटक पाहत असे. त्यामुळे या मुलींच्या कुटुंबियांनी त्या पोलिस कर्मचाऱ्याकडे प्रशिक्षण घेण्यास नकार दिला. पण त्यानंतर आरोपी रवी तिवारी या मुलींच्या घरी गेला आणि दोन्ही मुलींना पाठवण्यासाठी दबाव टाकू लागला.

दरम्यान, या सर्व प्रकारानंतर मुलींच्या आईने गिट्टीखदान पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून आरोपी रवी तिवारी याच्याविरोधात विनयभंग आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर त्याला अटकही झाली. या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेत पोलिस आयुक्तांनी रवी तिवारीला निलंबित केले.