शहरात भिक्षेकऱ्यांचा उच्छाद, पोलिसांचा कारवाईचा बडगा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शहरातील प्रमुख चौकात सिग्नल थांबलेले वाहनचालक तसेच नागरिकांना अडवून पैसे मागणाऱ्या भिक्षेकऱ्यांवर गेल्या दोन दिवसात गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. याप्रकरणी पोलिसांनी १७ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून त्यांना भीक मागण्यास प्रवृत्त करणाऱ्या २७ जणांविरोधात खटले दाखल केले आहेत.

शहरात भिक्षेकऱ्यांचा उच्छाद
शहरातील डेक्कन, लष्कर भागातील प्रमुख चौकांमध्ये सिग्नलला थांबलेले वाहनचालक आणि पादचारी नागरिकांना पैसे मागणाऱ्या भिक्षेकऱ्यांनी उच्छाद मांडला आहे. त्यामुळे गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी शहरातील प्रमुख चौकातील भिक्षेकऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्यावेळी सामाजिक सुरक्षा विभागाने प्रमुख चौकांची माहिती वाहतूक पोलसांकडून मागवून घेतली. त्यानंतर गेल्या दोन दिवसात सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने भिक्षेकऱ्यांवर कारवाई केली.

प्रमुख चौकांमध्ये कारवाई
शिवाजीनगर, लष्कर, रास्ता पेठ, बंडगार्डन रस्ता या परिसरात पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी भिक मागणाऱ्या १७ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून त्यांना भिक मागण्यास प्रवृत्त करणाऱ्या महिला आणि पुरुष मिळून २७ जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. पुढील काळात भिक्षेकऱ्यां विरोधात कारवाई सुरूच राहणार आहे. तरी नागरिकांनी ज्या भागात भिक्षेकरी भीक मागत असतील त्या चौकांची माहिती पुणे पोलीस नियंत्रण कक्षाला द्यावी असे आवाहन सामाजिक सुरक्षा विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिषा झेंडे यांनी केले आहे.