शिक्रापूर येथे काळ्या काचांच्या वाहनावर कारवाई

शिक्रापूर – शिरुर तालुक्याच्या शिक्रापूर येथे अनेक दिवसांपासून काळ्या काचांच्या वाहनांनी हैदास घातला असताना आता शिक्रापूर पोलिसांनी बेशिस्त वाहनांसह काळ्या काचांच्या वाहनांवर कारवाईचा धडाका सुरु केली असून वीस दिवसात तब्बल १७७१ वाहनांवर कारवाई करून तब्बल ५ लाख ९१ हजार ४०० रुपये दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांनी दिली आहे.

शिक्रापूर सह परिसरात सर्वत्र अनेक दिवसांपासून गडद काळ्या रंगांच्या काचांच्या वाहनांचा वावर वाढला आहे, त्यानंतर शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये फिरणाऱ्या सर्व बेशिस्त वाहन चालक व काळ्या काचांच्या वाहनांवर कारवाईचे आदेश पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांनी दिले असून त्यासाठी शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या वतीने एक पोलीस अधिकारी, नऊ पोलीस कर्मचारी, दहा होमगार्ड नेमण्यात आलेले आहे, त्यांच्याकडून परिसरातील बेशिस्त वाहनचालक आणि गडद काळ्या रंगाच्या काचांच्या वाहनांवर कारवाई सुरु करण्यात आलेली आहे, त्यानुसार शिक्रापूर पोलिसांनी दोन नोव्हेंबर पासून १६८४ बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करून ५ लाख ७४ हजार २०० रुपये तर ८६ काळ्या रंगाच्या काचांच्या वाहनांवर कारवाई करून १७ हजार दोनशे रुपये दंड असा एकूण ५ लाख ९१ हजार ४०० रुपये दंड वसूल केला आहे, तर काळ्या काचांच्या वाहनाच्या काळ्या फिल्म जागेवरच काढून टाकण्यात येत आहेत, पोलिसांच्या या कारवाईचा परिसरातील नागरिकांनी चांगलाच धसका घेतला असून, पुढील काळामध्ये काळ्या काचा नसल्याने गुन्हेगारी रोखण्यात देखील मोठी मदत होणार आहे.

नागरिकांच्या काचा काढल्या मग पोलिसांचे काय ?

शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काळ्या काचांच्या वाहनांवर कारवाई मोहीम पोलिसांनी सुरु केली असून सर्व नागरिकांच्या वाहनांवर दंड आकारला जात आहे, परंतु पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अनेक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वाहनांच्या काचा गडद काळ्या आहेत मग त्यांच्या वाहनांचे काय असा सवाल नागरिकांना पडला असून पोलिसांच्या वाहनांवर कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.