कोरेगाव भीमा मध्ये मास्क न वापणाऱ्यावर पोलिसांची दंडात्मक कारवाई

शिक्रापुर : मागील काही दिवसांपासून वाढत चाललेल्या कोरोनाच्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा, ता. शिरूर येथे विनामास्क, दुचाकीवर डबल सीट, विनामास्क दुकानदार अश्या व्यक्तीवर शिक्रापुर पोलिस व कोरेगाव भीमा ग्रामपंचायतच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात येत असून यामुळे विनामास्क फिरणाऱ्या लोकांचे धाबे दणाणले आहेत.

पोलिसांच्या बरोबरीने कोरेगाव भीमाच्या कोरोना क्षेत्रीय अधिकारी तनुजा शेलार, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र तुकाराम सात्रस यांनी स्वतः रस्त्यावर उतरून तब्बल 56 लोकांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली असून यांमधून सुमारे 11500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सध्या कोरेगाव भीमा येथील बाजारपेठ, होटेल, कपड्याची दुकाने सुरू असल्याने अनेक लोक गावात येत असतात. परंतु सोशल डिस्टनसिंग कोणीच पाळत नसल्याने अश्या लोकांमुळे कोरोनाचे रुग्ण वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.

यासाठी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, गावकामगार तलाठी अश्विनी कोकाटे, सहाय्यक क्षेत्रीय अधिकारी निवृत्ती सुरडकर, गणेश दाते, हिरामण ढोकले, सतीश शिवरकर, ग्रामपंचायत कर्मचारी सागर गव्हाणे, आनंदा पवार, होमगार्ड भानुदास लकडे आदी परिश्रम घेत आहेत. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर फिरु नयेत तसेच सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क व सॅनिटायझर चा वापर करावा असे आवाहन करत असताना यापुढे देखील विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर दंडात्मक कार्यवाही करणार असल्याचे सात्रस यांनी यावेळी सांगितले.