Pune News : कोंढव्यातील सराईत गुन्हेगार तडीपार

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – कोंढवा पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार साईराज राणाप्रताप लोणकर(वय २१, रा. पांडुरंग आळी, कोंढवा गावठाण) याला पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी २ वर्षासाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे.

साईराज लोणकर याच्यावर शरीराविरुद्धचे ५ गुन्हे कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल आहेत. त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई करुनदेखील त्याने पुन्हा गुन्हे केले आहेत. त्यांची कोंढवा परिसरात दहशत असून तो लोकांना दमदाटी करणे, लुटमार करणे असे प्रकार करीत असे.

कोंढवा पोलीस ठाण्याचे सर्व्हेलन्स अधिकारी उपनिरीक्षक स्वप्नील पाटील, अंमलदार चंद्रकांत माने, जगदीश पाटील, राजेंद्र ननावरे, जगदीश पाटील यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीविरुद्ध पुरावे गोळा केले.

दरम्यान तडीपारीचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांना सादर केला. या प्रस्तावाची पडताळणी करुन पाटील यांनी लोणकर याला २ वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्याचा आदेश दिला. त्यानुसार त्याला पंढरपूर येथे सोडण्यात आले आहे.