10000 ची लाच घेणारा पोलीस अँटी करप्शनच्या जाळ्यात, रात्री 10 वाजता कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पत्रे बसविताना मजुर वरुन पडून जखमी झालेल्या घटनेत कारवाई करु नये, यासाठी १० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पोलीस नाईकाला सापळा रचून रंगेहाथ पकडले. भरत सोनू बांगर (वय ३८) असे भोसरी एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या पोलीस नाईकाचे नाव आहे.

तक्रारदार यांना भोसरी एम आय डी सी तील एका कंपनीचे जुने पत्रे काढून नवीन पत्रे बसविण्याचे काम मिळाले होते. हे काम त्यांनी त्यांच्या परिचयातील एकाला मजुरीवर दिले होते. हे काम चालू असताना तो वरुन पडून जखमी झाला होता. त्याचा तपास पोलीस नाईक बांगर यांच्याकडे होता. त्यात तक्रारदार यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई न करण्यासाठी त्यांच्याकडे बांगर याने २५ हजार रुपयांची मागणी केली. तेव्हा तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली.

त्यांच्या तक्रारीची पडताळणी करताना पोलीस नाईक बांगर याने तडजोड करुन १५ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सापळा रचण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून १० हजार रुपये घेताना बांगर याला पकडण्यात आले. भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Visit : Policenama.com