पुरंदरमध्ये अवैद्य वाळू उपशावर पोलिसांची मोठी कारवाई ! वाळु साठ्यासह 47 लाखाचा मुद्देमाल जप्त

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन  –  एकीकडे कोरोना विषाणूने धुमाकूळ घातलेला आहे. त्याला नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन झुंज देत आहे. मात्र, अशा संकटात वाळू माफियांनी धुमाकूळ घातला आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पुरंदर तालुक्‍यातील जेऊर येथे गुरुवारी सायंकाळी जेजुरी पोलिसांनी घातलेल्या छाप्यात लाखो रुपयांचा वाळू साठा व वाळू उपसा करणारी यंत्रे जप्त केली.

याबाबत जेजुरीचे सहायक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांनी माहिती दिली की, गुरुवारी (ता. 7) सायंकाळी जेऊर येथील रसाळ महाराज मठाशेजारी नीरा नदीपात्रामध्ये अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने या ठिकाणी छापा घातला. पोलिसांनी छापा टाकल्यामुळे दोन पोकलेन मशिन, दोन ट्रॅक्‍टर, एक डंपर, वाळू धुण्याचे इंजिन व मोठ्या प्रमाणात उपसा केलेले वाळूचे ढीग त्याच ठिकाणी सोडून मशिनचे चालक अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.

वाळू उपसा करणारी वाहने पोलिसांनी जप्त केली असुन जप्त केलेल्या वाळूसाठ्याचा पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर त्याच ठिकाणी लिलाव करण्याचे आणि वाळू उपसा करणाऱ्या यंत्रांच्या मालकासह चालकांवर गुन्हा दाखल करणार असल्याचे माने यांनी सांगितले.
दरम्यान, तहसीलदार सरनोबत यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी नंदकुमार खरात यांनी पंचनामा केला.

यामध्ये अवैध वाळूउपसा करणारे जेऊर येथील संजय मारुती धुमाळ व दत्तात्रेय श्रीरंग धुमाळ यांचे दोन पोकलेन मशिन, दत्तात्रेय श्रीरंग धुमाळ व हनुमंत पोपट होळकर (रा. रुई) यांचे दोन ट्रॅक्‍टर; तर पिंपरे खुर्द येथील राजेंद्र बजरंग पटणे यांच्या मालकीचा डंपर असल्याचे खरात यांनी सांगितले. पोलिसांच्या छाप्यातील पथकामध्ये गणेश कुतवळ, देवेंद्र खाडे, धर्मराज खाडे, विजय ओंबासे, शैलेश स्वामी आदी सहभागी झाले होते.