मृताच्या कुटुंबीयांना पोलिसांकडून धमकीचे पत्र?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन
पोलिसांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केलेल्या मितेश जगताप यांच्या कुटुंबाला टिटवाळा पोलीस ठाण्यातून आणखी एक निनावी नावाने धमकीचे पत्र आले आहे. या निनावी पत्रामुळे जगताप कुटुंबीय भयभीत झाले असून, ते सध्या मोठ्या दहशतीखाली वावरत आहेत. यामुळे सरकारने या प्रकरणात लक्ष घालून न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच जर शासनाने लवकरात लवकर या प्रकरणात लक्ष घातले नाही तर मंत्रलयात आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा मृत मितेशचे वडील राजेश जगताप यांनी दिला आहे.

मितेश जगताप यांनी 23 ऑगस्ट 2017 रोजी पोलिसांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती. घडलेले प्रकरण दाबण्याचा पोलिसांनी भरपूर प्रयत्न केला. मात्र शेवटी उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर टिटवाळा पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी गणपत सुळे आणि हवालदार अनिल राठोड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळेच जगताप कुटुंबियांना धमकीचे सत्र सुरूच आहे. ही गार्भीयांची बाब असून हा प्रकार असाच जर पुन्हा चालू राहीला तर आम्हा कुटुंबांना आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याची खंत मितेशच्या आईने व्यक्त केली.

तसेच आमच्या घरी निनावी नावाने आलेल्या पत्राची चाैकशी करण्यासाठी टिटवाळा पोलीस ठाण्यात गेलो असता, पोलिसांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. यामुळे पत्र पाठविण्याच्यामागे टिटवाळा पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याचा हात असून शकतो असा आरोप मयत मितेशचे वडील राजेश जगताप यांनी केला आहे.