मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवणाऱ्या विद्यर्थ्यांना पोलिसांनी केली अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्याच्या बालेवाडी क्रीडा संकुलामध्ये ‘खेलो इंडिया’ या युथ गेम्सच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री आले असता त्यांच्या गाडीचा ताफा विद्यार्थ्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला. हे विद्यार्थी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेचे असल्याचे पोलीसांच्या वतीने सांगण्यात आले आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक फी माफ करण्याच्या मागणी सहीत अन्य मागण्यासाठी हे आंदोलन विद्यार्थ्यांनी केले आहे.

दुष्काळाची परिस्थिती भीषण असल्याने दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांची फी शासनाने लवकरात लवकर माफ करावे हि मागणी घेऊन या विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केले आहे. ऊस शेतकऱ्यांना एक रक्कमी एफआरपी देण्यात यावी. महापोर्टल व्दारे भरती नकरता महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाच्या मार्फत महाभरती करण्यात यावी तसेच विद्यार्थ्यांवर बेताल वक्तव्य करणाऱ्या शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात यावा या मागणीसाठी या विद्यार्थ्यांकडून मागणी करण्यात आली होती. याच मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी या मुलांनी मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नावेळी विद्यार्थ्यांनी राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यांच्या आरड्या ओरड्याने गोंधळ माजला म्हणून पोलिसांनी या विद्यार्थ्यांना अटक केली. अमाेल हिप्परगे, प्रवीण भाेसले, शर्मिला येवले, साैरभ वळवडे या विद्यार्थांना घटना स्थळावरून ताब्यात घेतले आणि त्यानंतर त्यांना हिंजवडी पोलीस ठाण्यात स्थान बद्ध करून ठेवण्यात आले. काही काळानंतर त्यासर्व विद्यार्थ्यांना सोडून देण्यात आले. त्यांना मुख्यमंत्रीच्या कार्यक्रम समाप्ती पर्यंत पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले होते.

आमच्या मागण्या अत्यंत महत्वाच्या आहेत. म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. तसेच विनोद तावडे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल राजीनामा देण्याची मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांना करणार होतो. परंतु आम्हाला पोलीसांनी अटक केली आणि काही वेळाने सोडून दिले असे अमाेल हिप्परगे या आंदोलनात सहभागी असणाऱ्या विद्यार्थ्याने म्हणले आहे.