खाकी वर्दीनं ‘कुटुंबप्रेम’ आणि ‘कर्तव्य’ यांचा समन्वय साधला

पुणे : खादी वर्दीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची भीती आणि दुसरीकडे कुटुंब यांचा समन्वय साधत कर्तव्य बजावताना तारेवरची कसरत करावी लागली. कोरोनाच्या सावटामध्ये दिवसरात्र ड्युटी आणि दुसरीकडे घरी जाताना आपल्यामुळे कुटुंबाला त्रास होणार नाही, अशी भीती मनामध्ये घर करत होती, असे येरवडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांनी सांगितले.

वाघमारे म्हणाले की, कोरोना विषाणूमुळे जगावर संकट ओढवले आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी 22 मार्च रोजी कडकडीत जनता कर्फ्यू राबविला. त्यानंतर लगेच 23 मार्चपासून 14 एप्रिलपर्यंत देशभर लॉकडाऊन जाहीर केले, त्यातून हॉस्पिटल, भाजीपाला, किराणा माल, औषधालयाबरोबर अत्यावश्यक सेवा वगळल्या आणि पोलीस यंत्रणेचे कसोटी सुरू झाली. शहर आणि गावच्या सीमेवर पोलिसांचा चोवीस तास खडा पहारा सुरू झाला. प्रत्येक वाहन आणि व्यक्तीचा तपास करताना कोरोना रुग्ण, बाधित रुग्ण आणि संशयितांचाही समावेश होता.

प्रगतराष्ट्रामध्ये कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत होते. भारतामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आणि मनामध्ये अनेक प्रश्नांची घालमेल सुरू झाली. पोलीस खात्यामध्ये नोकरी करीत असताना वेळेचे बंधन नसते. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून पोलिसांच्या जीवाची घालमेल सुरू झाली. समाजाची सेवा करीत असताना कुटुंबाला त्रास होणार नाही, यासाठी आम्ही कुटुंबापासून दूर राहून पोलीस स्टेशनला क्वारंटाइन करून घेतले. पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या रुममध्ये थांबायचे आणि घरी गेलो, तर बाहेर बसूनच चहा-नाश्ता घेतला. लग्नाचा वाढदिवसही बाहेर थांबून साजरा करीत असताना भीती होती. लग्नाला बारा वर्ष म्हणजे एक तप पूर्ण केले. मुलीचा वाढदिवसही घराबाहेर थांबूनच साजरा करावा लागला, ही सल मनामध्ये कायम आहे. घराच्या दारात असूनही एकत्र राहता आले नाही.

दरम्यानच्या काळात माझ्या मुलाने व्हाट्सअ‍ॅपवर चिठ्ठी पाठविली, त्यामध्ये लिहिले पप्पा प्लीज कम टुमारो होम. चिठ्ठी वाचताना भावना उफाळून आल्या. एकीकडे कर्तव्य आणि दुसरीकडे पुत्रप्रेम अशा कात्रित अडकलो. प्रत्येकजण कुटुंबाची काळजी घेतो असतो. मात्र, कोरोना विषाणूच्या संकटात हतबल झालेल्यांची सेवा करण्याची संधी मिळाली, हे आमचे भाग्यच आहे, असे म्हणावेसे वाटत आहे.

उत्तर प्रदेशमधील कुटुंब हिंजवडीमध्ये राहत होते. मात्र, त्यांना गावाकडे जायचे होते, त्यासाठी शास्त्री चौक येथे त्यांना थांबले, त्यांना गावाकडे जायचे होते. पायी कसे जाणार असे विचारले, तर ते म्हणाले आम्ही पायी कधी तरी गावी जाऊ. त्यावेळी त्यांना क्वारंटाइन करतो असे सांगितले. मात्र, ते थांबायला तयार नव्हते. त्यांच्याबरोबर लहान मुले होती, त्यांना चहा-बिस्कीट, फुडपॅकेट देऊन जेऊ घातले. त्यानंतर पोलीस आणि महाराष्ट्राविषयी त्यांचे मतपरिवर्तन झाले. त्यामुळे त्यांनी क्वारंटाईनमध्ये थांबण्यास तयार झाले. बसेस सुरू झाल्यानतंर त्यांची गावी पाठविण्याची व्यवस्था केली.

देशभर लॉकडाऊन असल्यामुळे पगारदारांकडे काहीशी शिल्लक होते. मात्र रोजंदारीवर काम करणाऱ्यांचे हाल होताना पाहून जीवाची घालमेल होत होती. त्यामुळे संस्था, संघटनांच्या माध्यमातून त्यांना धान्यरुपी मदत केली. झारखंडमधील कामगार अडकले होते, त्यांना सात दिवस अन्नधान्य दिले. लॉकडाऊन शिथील केल्यानंतर त्यांना गावी जाण्याची व्यवस्था केली. येरवडा पोलीस स्टेशन अंतर्गत सुमारे साडेतीन हजार परप्रांतीयांबरोबर राज्यातील छत्तीसगड, मध्यप्रदेश, राजस्थानमधील मजुरांना फूड पॅकेट, ब्लँकेट, पाणी बॉटल देऊन रेल्वे आणि एसटी बसने सुखरूप पाठविले. मी घरी नसताना पत्नीने मोलकरणींना घरातील गहू दिला. त्यानंतर मला मदत केल्याच सांगितले. प्रत्येकाची मदत करण्याची भावना आहे, ही महाराष्ट्राच्या मातीची किमया आहे.

आरोपी, फिर्यादीचा संपर्क असतो, त्यामुळे अनेक पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कुटुंब दूर ठेवून समाजसेवेला वाहून घेतले आहे. लोकांनी लोकांसाठी चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही, अशी लोकशाहीची व्याख्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी केली आहे. अडचणीच्या काळातील चिमुटभर मदत अत्यंत मोलाची असते, अशी भावना संकटकाळात अडकलेल्यांनी व्यक्त केल्याचे अनुभवाचे बोल वाघमारे यांनी सांगितले.