पुणे-सोलापूर महामार्गावर पोलिसांच्या गाडीला अपघात, 2 कर्मचारी गंभीर जखमी

पुणे/कळस : पोलीसनामा ऑनलाइन – फायरिंगच्या सरावासाठी जात असताना पोलिसांच्या मिनी बसचे मागचे टायर फुटून झालेल्या अपघातात दोन पोलीस कर्माचारी गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज (सोमवार) सकाळी साडे आठच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावरील इंदापूर तालुक्यातील बिजवडी येथे झाला. बसमधील पोलीस कर्मचारी सोलापूर राज्य राखीव पोलीस बल गट -10 मधील आहेत.

या अपघातात बस चालक पोलीस नाईक यू.आर. सातव आणि पोलीस शिपाई एस.डी. चव्हाण हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना महामार्ग पोलिसांनी तातडीने इंदापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पोलीस शिपाई चव्हाण यांना गंभीर दुखापत झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

महामार्ग पोलीस केंद्राचे सहायक फौजदार बी.जे. जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापूर राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दहा मधील पोलीस अधिकारी व कर्मचारी दौंड येथे फायरिंग साठी मिनी बसमधून जात होते. बिजवडी गावच्या हद्दीत बस (एमएच 13 पी 0437) आली असता बसचा डाव्या बाजूचा मागील टायर फुटला. त्यामुळे बस पलटली. यामध्ये चालक सातव आणि पोलीस शिपाई चव्हाण हे जखमी झाले.

तर सहाय्यक फौजदार एस.बी. बगाड, पोलीस कर्माचारी एस.आर. काळे. एस.ए. पवार, एस.व्ही. तीर्थकर, व्ही.एस. साबरे, जी.एच. जाधव, एस.एम बनसोडे यांना किरकोळ मार लागला. महामार्ग पोलिसांनी जखमींना इंदापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठवून दिले. महामार्ग पोलीस केंद्राचे बी.जे. जाधव, पोलीस हवालदार डी.के.मदने, भिमराव आहेर, वाघ यांनी घटनास्थळावरील अपघातग्रस्त बस क्रेनच्या सहाय्याने बाजूला केली.

You might also like