‘पाठ’ थोपटून घेताना पोलिसांनी केली पुणेकरांची ‘कोंडी’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सर्व नागरिकांनी कायद्याचे पालन करावे, अशी अपेक्षा असते. कायद्याचे पालन न करणाऱ्यांना विशेषत: वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे ज्यांना अधिकार आहेत, अशांवर तर चुकूनही वाहतूक नियमभंग होणार नाही,  याची काळजी घेण्याची मोठी जबाबदारी असते. पण पुणे पोलीस त्याला अपवाद आहेत. याचा प्रत्यय गेले दोन दिवस सेनापती बापट रोडवरुन जाणाऱ्या हजारो नागरिकांना येत होता. निमित्त होते पुणे पोलिसांकडून सुरु केलेल्या विविध उपक्रमांच्या लोकापर्ण कार्यक्रमाचे.

राज्यपाल डॉ. सी. विद्यासागर, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे पोलीस राबवित असलेल्या उपक्रमांचे तोंड भरुन कौतुक केले. मात्र स्वत: पाठ थोपटून घेताना पुणे पोलिसांनी ज्या कारणासाठी लोकांकडून सहकार्य मागितले व लोकांनी दिले. त्याच वाहतूक नियमांना पायदळी तुडविण्याचे काम दोन दिवस सुरु होते. दुदैवाने त्यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपासून वाहतूक पोलीस अधिकारी तितकेच सहभागी झाले होते.

सेनापती बापट रोडवर नो पार्किंग आहे. येथील सिंबायोसिस संस्थेच्या विश्वभवनात  या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या तयारीसाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा मंगळवारपासून तेथे येत होता. या सर्वांच्या गाड्या नो पार्किंगमध्ये बिनधास्तपणे लावल्या जात होत्या. बुधवारी दुपारनंतर तर कहर झाला. शहरातील सर्व अतिवरिष्ठ पोलीस अधिकारी, वरिष्ठ अधिकारी, पोलीस निरीक्षक अशा शेकडो गाड्या सेनापती बापट रोडवरील नो पार्किंगमध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभ्या करण्यात आल्या होत्या. त्यात वाहतूक पोलीस उपायुक्तांपासून सहायक आयुक्त, निरीक्षकांच्याही गाड्या लावण्यात आल्या होत्या. मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होत.

आत सभागृहात पुणे पोलिसांची वागणुक सौजन्यपूर्ण आहे, त्यांना नागरिकांचे सहकार्य वाढत आहे, असे कौतुक सुरु असताना त्याच्या नेमके उलटे चित्र बाहेर रस्त्यावर दिसत होते. आयपीएस अधिकाऱ्यांनीही आपली गाडी व आपल्या कनिष्ठांनी त्यांच्या गाड्या नो पार्किंगमध्ये लावल्या हे माहिती असूनही त्यांनी त्याची फिकीर केली नाही.

पोलिसांच्या या शेकडो गाड्यांमुळे सायंकाळी नेहमी वाहतूक कोंडी होणाऱ्या या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर कोंडी झालेली दिसत होती. जाणारे येणारेही पोलिसांच्या या अशा बेकायदा पार्किंगवर नाराजी व्यक्त करीत होते. काही जणांनी तर  हे पहा आम्हाला नियम शिकविणारे स्वत: काय करीत आहेत. आता त्यांच्याकडून कोण दंड वसुल करणार? अशा शब्दात आपल्या प्रतिक्रिया देत होते.

अनेक दिवस अगोदर ठरविण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे व्यवस्थित नियोजन करु शकत नाही आणि आपण साधे वाहतूकीचे नियम पाळू शकत नाही आणि त्याची कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला साधी खंत वाटत नाही. सर्व नियम लोकांनी पाळावे नाही तर आम्ही काठी घेऊन बसलो आहोत, असे सांगताना आम्हाला मात्र कोणतेही नियम लागू नाहीत याचा प्रत्यय पुणे पोलिसांनी काल पुणेकरांना दिला.

आरोग्यविषयक वृत्त –