DySp च्या नावाने पोलिसच घेत होता हप्ता

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – नाशिक येथील पेठ डिव्हिजन कॅम्प येथील पोलीस उपअधीक्षकांच्या गाडीवरील वाहनचालक पोलीस नाईकच उपअधीक्षकांच्या नावाने हॉटेलचालकांना धमकावून त्यांच्याकडून दरमहा ५ हजार रुपये हप्ता घेत असल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे नाशिक पोलीस दलात खळबळ माजली आहे.

याप्रकरणी नाशिक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस नाईक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

विलास काशीनाथ पाटील (पोलीस नाईक, वाहन चालक, पोलीस उपअधीक्षक पेठ डिव्हिजन, कॅम्प) असे गुन्हा दाखल झालेल्या पोलिसाचे नाव आहे.

याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सांगितले की, त्र्यंबकेश्वर जव्हार रोडवर तक्रारदार यांचे यशराज हॉटेल आहे. हे हॉटेल उशिरापर्यंत चालू होते. १० नोव्हेबर पोलीस विलास पाटील हा या हॉटेलमध्ये गेला. त्याने हॉटेल उशिरापर्यंत चालू राहिल्यास कारवाई करेल. नाही तर पेठ डिव्हिजनचे पोलीस उपअधीक्षक यांना दरमहा ५ हजार रुपये हप्ता द्यावा लागेल, असे सांगितले. त्यानंतर हॉटेलचालकावरुन ५ हजार रुपये घेतले.

विलास पाटील याचे हे संभाषण हॉटेलचालकाने मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्डिग केले होते. त्यांनी याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. तेथील अधिकाऱ्यांनी पंचासमक्ष पाहिले. त्यात विलास पाटील तुला दरमहा हॉटेल चालू ठेवण्यासाठी ५ हजार रुपये डेप्युटी साहेबांकरिता हप्ता द्यावे लागेल अशी मागणी करताना व पैसे घेताना दिसत आहे.

या व्हिडिओ रेकॉर्डिंग वरुन व तक्रारीवरुन लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करुन लाच घेतल्याबद्दल विलास पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. रेकॉर्डिंग केलेला मोबाईलही ताब्यात घेतला आहे.

अधिकाऱ्यांच्या नावावर वाहनचालकच हप्ता मागत असल्याचे स्पष्ट झाल्याने नाशिक पोलीस दलात एकच खळबळ माजली असून आपल्या हाताखालील कर्मचारी आपल्या नावाचा गैरवापर करुन बाहेर परस्पर अशा खंडण्या, हप्ते मागत नाहीत ना, याची खात्री वरिष्ठ अधिकारी करु लागले आहेत.