पोलीसच चक्क हप्ता म्हणून घेत होते ड्रग्ज 

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – मध्य भारतातील कुख्यात ड्रग्ज माफिया याच्याशी संपर्कात असलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना या माफियानेच ड्रग्ज एडिक्ट बनविले असून ते चक्क हप्ता म्हणून ड्रग्ज घेत होते, अशी माहिती पुढे आली आहे. आबू खान यानेच त्यांना एमडीची नशा लावून आता त्यासाठी त्यांना आपल्या इशाऱ्यावर नाचवत असल्याचे समजते.

ड्रग्ज माफिया आबू खान याच्याशी संपर्क असल्याच्या कारणावरुन नागपूर पोलीस आयुक्तांनी चार पोलीस उपनिरीक्षकांसह सहा पोलिसांना निलंबित केले आहे. या टोळीशी हे पोलीस संबंधित होते. अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी एमडीच्या नशेची लत लावून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यात केवळ आबू आणि त्याचे गुन्हेगार साथीदारच नव्हे तर उपरोक्त पोलिसांचाही सहभाग असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, या मंडळींपैकी पोलीस कर्मचारी जयंता शेलोटचे आबूच्या फोनवर चक्क ८०० कॉल्स आढळले. जयंताला यापूर्वीही अनेकदा निलंबित करण्यात आले आहे.

निलंबित पोलीस उपनिरीक्षक आणि कर्मचारी हे ड्रग्ज माफिया आबूकडून प्रारंभी हप्ता म्हणून बक्कळ रक्कम घेत होते. मात्र नंतर आबूने त्यांना एमडी पावडरच्या नशेची लत लावली. त्यामुळे हे सहाही जण नशेडी बनल्याची चर्चा आहे. एमडी मिळावी म्हणून ते आबूच्या इशाऱ्यावर काम करायचे, असेही बोलले जाते. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी या सहा जणांचा डिफॉल्ट रिपोर्ट आठवडाभरापूर्वी वरिष्ठांकडे पाठविला. बराच विचारविमर्श केल्यानंतर या नशेडी कर्मचाऱ्यांना पोलीस दलात ठेवून शहर पोलीस दलातील आणखी काही जणांना भ्रष्ट तसेच नशेडी बनविण्याऐवजी या सहा जणांना निलंबित करण्याचा निर्णय वरिष्ठांनी घेतला. या सर्वांची खातेनिहाय चौकशी करून त्यांना बडतर्फ केले जाण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.