सांगली : पोलिस कल्याण सप्ताह उत्साहात

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन
जिल्हा पोलिस दलातर्फे 31 मे ते 7 जून दरम्यान पोलिस कल्याण सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताहानिमित्त आरोग्य तपासणी, स्वच्छता मोहीम, योग शिबिर आदी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.

पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, अतिरिक्त अधीक्षक शशिकांत बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम उत्साहात साजरे करण्यात आले. यावेळी सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचार्‍यांचा सत्कार करण्यात आला. दोन दिवशीय योगा शिबिरही आयोजित करण्यात आले होते. याला चांगला प्रतिसाद मिळाला. पोलिसांच्या कुटुंबियांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सर्व पोलिस ठाण्यासह कुटुंबियांना पोलिस कल्याण उपक्रमांची माहिती पुस्तकांचे वाटप करण्यात आले.

पोलिस वसाहतीमध्ये स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अधिकारी, कर्मचार्‍यांनी भाग घेतला. एंपथी फाऊंडेशनतर्फे आयोजित नेत्र तपासणी शिबिराचाही अनेकांनी लाभ घेतला. यावेळी डोळ्यांची मोफत तपासणी करून चष्म्यांचे वाटप करण्यात आले. पोलिसांच्या मुलांना स्पर्धा परिक्षांविषयी निरीक्षक ए. एच. तनपुरे यांनी मार्गदर्शन केले. वरद हॉस्पीटल, डॉ. योगेश साळुंखे यांच्यामार्फत आयोजित आरोग्य शिबिरात मधुमेह, रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, इसीजी तपासणी करण्यात आली.
निरीक्षक तनपुरे, ए. टी. नलवडे, एल. एल. सलाम, चंद्रकांत मरगाळे यांनी संयोजन केले.