अर्णब गोस्वामी यांना मोबाईल फोन देणे, दोन पोलीस कर्मचाऱ्यांना पडले महागात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असताना रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना मोबाईल फोन वापरण्यास देणे दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगलोट आले आहे. तुरुंगात असलेल्या कैद्यांना पैशाच्या मोबदल्यात स्वत:चा मोबाईल फोन वापरण्यास दिल्याप्रकरणी या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

अर्णब गोस्वामी यांना ४ नोव्हेंबर रोजी अलिबाग पोलिसांनी अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अटक केली होती. त्यानंतर त्यांना अलिबाग न्यायालयाने १८ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना अलिबाग येथील शाळेत विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. पण तेव्हाच अर्णब गोस्वामी हे मोबाईल वापरत असल्याचे तद्वत समाज माध्यमात अ‍ॅक्टिव असल्याचे दिसून आले.

याप्रकरणी कारागृह प्रशासनाने गंभीर दखल घेत खात्यांतर्गत चौकशी सुरू केली. तद्वत, अन्य अन्य कैद्यांचीही चौकशी केली असता, कारागृहातील दोन पोलीस कर्मचारी पैशांच्या बदल्यात कैद्यांना स्वत:चा मोबाईल वापरासाठी देत असल्याचे उघडकीस आले. तदनंतर, सुभेदार अनंत भेरे आणि पोलीस शिपाई सचिन वाडे यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.