खाकी वर्दीतील माणुसकी ! ‘हे’ पोलिस करणार अनाथ मुलीचा ‘संभाळ’

लखनऊ : वृत्तसंस्था –  उत्तरप्रदेश येथे २३ मुलांना ओलिस ठेवणाऱ्या व पोलिस चकमकीत मारल्या गेलेल्या व्यक्तीच्या १ वर्षीय अनाथ मुलीचा पोलीस अधिकारी मोहित अग्रवाल हे सांभाळ करणार आहेत. अशी माहिती अग्रवाल यांनी एका वृत्तसंस्थेला दिली. तसेच ही मुलगी माझ्याप्रमाणेच एक पोलिस अधिकारी व्हावी अशी इच्छा देखील त्यांनी व्यक्त केली.

ही घटना फारुखाबाद येथील कसारिया गावात घडली असून पोलिस चकमकीत सुभाष बाथम हा ठार झाला आहे. त्याने आपल्या मुलीच्या वाढदिवसासाठी मागच्या गुरुवारी २३ मुलांना आमंत्रित केले होते. दरम्यान बाथमवर पोलिस ठाण्यात अनेक गुन्ह्यांची नोंद देखील आहे. बाथम याने आपल्यावरील गुन्हे पोलिसांनी मागे घ्यावेत यासाठी या मुलांना आपल्या घराच्या तळघरात तब्बल ८ तास डांबून ठेवले होते. याबाबत कळताच पोलिसांच्या एका पथकाने सुभाष बाथमवर कारवाई केली आणि या गोळीबारात ८ पोलीस व १ नागरिक जखमी झाला. या चकमकीत तो अखेर ठार झाला.

बाथमने ओलिस ठेवलेल्या मुलांचे पालकही कारवाईदरम्यान घराभोवती जमा झाले होते. पोलिसांनी घराभोवती वेढा टाकल्यानंतर बाथमची पत्नी रुबी कथेरिया हिने घरातून पळ काढण्याचा प्रयत्न केला होता मात्र ओलीस असलेल्या मुलांच्या संतप्त पालकांनी केलेल्या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला. दरम्यान कारवाई झाल्यानंतर बाथम व रुबीची एक वर्षीय मुलगी पोलिसांना घरात एकटीच आढळली.

मुलीच्या शिक्षणासाठी बँक खाते काढणार
अग्रवाल यांनी सांगितलं की या मुलीच्या शिक्षणासाठी मी तिच्या नावे एक बँक खाते काढणार असून त्यात नियमित पैसे भरणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच तिला उच्च शिक्षण देऊन तिच्या शिक्षणात खंड पडू देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच मोठेपणी ती माझ्याप्रमाणेच पोलिस अधिकारी व्हावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. तसेच ते म्हणाले की या मुलीला एखाद्या पोलीस अधिकारी दाम्पत्याने दत्तक घ्यावे आणि जरी कुणीही तिला दत्तक घेतले तरीही तिचा संपूर्ण खर्च व संगोपनावर माझं लक्ष असणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

नातेवाईकांनी फिरविली पाठ
या मुलीचा स्वीकार करण्यासाठी तिच्या नातेवाईकांनी पाठ फिरविली आहे. कारण बाथम व रुबीने आपल्या कुटुंबीयांच्या मर्जीविरोधात लग्न केले होते. मात्र देशभरातील अनेक जणांनी या चिमुरडीला दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सध्यस्थितीला पोलीस विभागातील एक महिला या मुलीचा सांभाळ करत आहे.