‘व्हिडिओ’ रेकॉर्ड करून पोलिसाला ब्लॅकमेल करणाऱ्याचा प्रयत्न, 2 युवक’ गोत्यात’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – मोबाईलवर व्हिडिओ शुटींग करुन ते व्हायरल करण्याची धमकी देऊन पोलीस कर्मचाऱ्याला ब्लॅकमेल करणाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे. रवींद्र भागवत सातपुते (रा़ हनुमाननगर, बारामती) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याचा साथीदार विजय कोकरे (रा. बाणेर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी पोलीस शिपाई संदीप दादु कांबळे यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार चिंचवड येथील शिवाजी चौकात १९ नोव्हेंबरला सायंकाळी सव्वा सहा वाजता घडला. याबाबत पोलिसांनी सांगितले की, संदीप कांबळे हे चिंचवड वाहतूक शाखेत नेमणूकीला आहेत. ते मंगळवारी सायंकाळी शिवाजी चौकात असताना रवींद्र सातपुते व विजय कोकरे तेथे आले व त्यांनी चौकात संदीप कांबळे यांचे व्हिडिओ व फोटो काढले.

ते कांबळे यांना दाखवून तुमचे व्हिडिओ आम्ही सोशल मिडियावर व्हायरल करणार आहे. यापूर्वी आम्ही बरेच पोलिसांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करुन त्यांना घरी बसविले आहे. तुमचे व्हिडिओ व फोटो व्हायरल करायचे नसतील तर तुमची किती पैसे द्यायची तयारी आहे. आता सध्याला १० हजार रुपये द्या आणि मला मोकळे करा. तुम्हाला काहीही होणार नाही. १० हजार रुपये चिल्लर आहे. बाकीची रक्कम फोनद्वारे संपर्क करुन तुम्हाला कळवितो, अशी धमकी दिली. कांबळे यांच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी सातपुते याला खंडणीच्या गुन्ह्यात अटक केली आहे.

Visit :  Policenama.com