धक्कादायक ! घरी आल्यानंतर 4 तासांत पोलिसाचा मृत्यू

पोलिसनामा ऑनलाईन – राज्यभरात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणार्‍यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामध्ये पोलिसांचाही समावेश आहे. अशीच एक घटना वांद्रे पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍याच्या बाबतीत घडली आहे. ठाण्यात नेमणुकीस असलेले हवालदार दीपक हाटे यांचा शुक्रवारी कोरोनाने मृत्यू झाला. दहा दिवस शासकीय केंद्रात उपचार घेतल्यानंतर हाटे यांना घरी सोडण्यात आले होते. घरी परतल्यानंतर चार तासांतच त्यांचा मृत्यू झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मुंबई पोलीस दलातील मृतांची संख्या 16 झाली आहे.

वरळी पोलीस वसाहतीत दीपक कुटूंबियासह वास्तव्यास होते. 18 मे ला त्यांची प्रकृती खालावली. कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट होताच त्यांना वरळीच्या वल्लभभाई स्टेडियम येथील केंद्रात दाखल करण्यात आले. 10 दिवस उपचार घेतल्यानंतर गुरुवारी रात्री त्यांना घरी सोडण्यात आले. मात्र अवघ्या चार तासानंतर त्यांचा मृत्यू झाला. दीपक यांच्याबाबतची एक ध्वनिचित्रफीत शुक्रवारी समाजमाध्यमांवर प्रसारित झाली. या चित्रफितीत ते अशक्त असल्याचे स्पष्टपणे दिसते, अशी माहिती एका पोलिसाने दिली. दरम्यान, मुंबईत आत्तापर्यंत 16 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. शुक्रवारी 715 रुग्ण बरे होऊन घरी गेले. शुक्रवारी मुंबईत 1437 नवीन रुग्णांची नोंद झाली असून बाधितांचा आकडा 36 हजार 710 वर गेला आहे. शुक्रवारी मुंबईत सर्वाधिक 715 रुग्णांना घरी पाठवण्यात आले. गेल्या काही दिवसांत पाच हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.