हॉटेलचालकांकडून पैसे उकळणारे तोतया पोलीस जेरबंद

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन – पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवून हॉटेल व्यावसायिकाकडून पैसे उकळणाऱ्या भामट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. याप्रकरणी चार तोतया पोलिसांना पोलिसांनी जेरबंद केले आहे.

पंकज मिसाळ (वय २८, रा. निमगाव केतकी, इंदापूर), राहुल चव्हाण (वय २०, रा. मदनवाडी, ता. इंदापूर), अंकिता भोसले (वय २९), प्रज्ञा भोसले (वय २१ , दोघीही रा. बारामती) यांना अटक करण्यात आली आहे, तर ओंकार शितोळे (रा. पाटस , ता. दौंड),दादा (पूर्ण नाव समजू शकले नाही, रा. इंदापूर) हे दोघे फरार झाले आहे. यातील पंकज मिसाळ हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.

गिरीम फाटा येथे चंद्रशेखर रेड्डी यांचे साई पॅलेस हॉटेल आहे. शनिवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास एका गाडीतून ४ तरुण आणि २ तरुणी उतरल्या. हॉटेलमध्ये येऊन त्यांनी काउंटरला घेरा घातला. रेड्डी यांना आम्ही वरिष्ठ पोलीस अधिकारी आहोत. तुमच्या हॉटेलमध्ये अवैध व्यवसाय सुरू असतो. असे म्हणत एकाने गल्ल्यात हात घातला. आणि तीस हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर प्रकरण मिटवायचे असेल तर १ लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले.

तर यातील अंकीता भोसले हिच्याकडील भारत अगेन्स्ट करप्शनचे ओळखपत्र दाखवले. त्यानंतर रेड्डी यांनी पुन्हा २५ हजार रुपये दिले. हे पैसे घेऊन ते सर्वजण त्यांची गाडी घेऊन निघाले. त्यावेळी रेड्डी यांना या सर्व प्रकाराबाबत शंका आली. त्यांनी भामट्यांच्या गाडीचा पाठलाग केला. ते अशाच प्रकारे खडकी येथील बब्बी ढाबाचालक रवी पुजारी याला धमकावत होते. रवि पुजारी यांनी त्यांना २० हजार रुपये दिले. त्यानंतर काही वेळाने पुजारी यांनी रावणगाव पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ धाव घेतली. पोलिसांना पाहून मात्र या सर्वांची धांदल उडाली. त्यानंतर दोघे भिंतीवरून उडी मारून पसार झाले. तर चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.

You might also like