जात पंचायतीच्या राड्यात पोलीस हवालदार गंभीर जखमी

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – शौचालयात महिलेबद्दल अबशब्द लिहल्यावरून बसलेल्या जात पंचायतीमध्ये दोन गटात राडा झाला. यावेळी पोलीस भांडण सोडविण्यासाठी गेले असता पोलिसांवरच हल्ला करण्यात आला. यावेळी एका पोलिसाला काठीने बेदम मारहाण केल्याने त्यांची प्रकृती गंभीर आहे. या हल्ल्यात आणखी दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. हा राडा वाकड पोलीस ठाण्यासमोर गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास घडला. वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल करून पाचजणांना अटक केली आहे.
पोलीस हवालदार प्रमोद भांडवलकर हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच पोलीस हवालदार जगदाळे, गंभिरे हेही जखमी झाले आहेत. तसेच पोलीस अधिकारी आणि इतर कर्मचारी यांना धक्काबुकी करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस नाईक व्ही.एस. कुदळ यांनी फिर्याद दिली आहे. तर साजन सुभाष सुकळे (१९), सुभाष रामा सुकळे  (४०), लहू बापू सुकळे (२३), अनिल अण्णा सुकळे (२२), शिवाजी बापू सुकळे (३०, सर्व रा. म्हातोबानगर झोपडपट्टी, वाकड) या पाच जणांना अटक केली आहे.

यशवंत लक्ष्मण सुकळे, दिगंबर लक्ष्मण सुकळे, तानाजी रामा सुकळे, राजाराम रामा सुकळे, अर्जुन रामा सुकळे, सतीश अर्जुन सुकळे, शिला उर्फ बाबू लक्ष्मण सुकळे, साखरबाई बापू सुकळे, रखमाबाई अर्जुन सुकळे, जनाबाई शिवाजी सुकळे, बापू गोविंद सुकळे, गंधारबाई सुभाष सुकळे आणि इतर चार, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार म्हातोबानगर झोपडपट्टीतील सार्वजनिक शौचालयात एका महिलेबद्दल अबशब्द लिहण्यात आले होते. यासाठी दोन्ही बाजूने जात पंचायत बसली होती. यावेळी त्यांच्यात अचानक वादावादी सुरू झाली. त्याच दरम्यान कुदळ आणि भांडवलकर आणि त्यांचे सहकारी तेथून निघाले होते. एकजण कोयता काढून दुसऱ्याच्या अंगावर जात असल्याने पोलीस भांडण सोडविण्यासाठी गेले.

पोलिसांना पाहून हे सर्व दोन्ही बाजूचे आणि महिला यांनी पोलिसांवर हल्ला केला. पोलिसांना धक्काबुकी करून आरडा ओरडा केला. भांडलकर यांना काठीने मारहाण करण्यात आली. यामध्ये ते फॅक्चर झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यावेळी इतर पोलीस अधिकारी, कर्मचारी आले असता त्यांनाही धक्काबुकी करण्यात आली. पोलिसांनी गंभीर दुखापत, सरकारी कामात अडथळा, राईट या कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.