मॉलमधील शर्ट चोरून पळून जात होता पोलीस शिपाई, मॉल कर्मचाऱ्यांकडून धुलाई

लखनऊ : वृत्तसंस्था – मॉलमधील दुकानातून तीन शर्ट चोरून पाळणाऱ्या एका पोलीस शिपायाला मॉलमधील कर्मचाऱ्यांनी मारहाण केली आहे. ही घटना लखनऊ मधील आहे. हा पोलीस शिपाई मॉलमधील नवेकोरे शर्ट घालून पळण्याच्या प्रयत्नात होता. पण तो मॉलमधील कर्मचाऱ्यांच्या हाती लागला. तेव्हा त्या कर्मचाऱ्यांनी त्याला मारहाण केली व त्या मारहाणीचा व्हिडीओदेखील तयार केला. आदेश कुमार हा उत्तर प्रदेश पोलीस दलात कार्यरत होता. त्याच्या या कृत्यामुळे संपूर्ण पोलीस दलाची मान खाली गेली आहे.

काय आहे नेमका प्रकार
आदेश कुमार हा हुसेनगंजमधील व्ही मॉलमध्ये गेला होता. तेव्हा त्याने ट्रायल रुममध्ये जाऊन एकावर एक असे ३ शर्ट घातले. आणि त्यानंतर त्याने आपला पोलीस गणवेश परिधान केला. गणवेशाच्या खाली तीन नवे शर्ट लपवून तो पळून जाण्याच्या प्रत्नात होता. मात्र शर्टवर असलेल्या बारकोडमुळे मेटल डिटेक्टरवरील अलार्म वाजला आणि तो कर्मचाऱ्यांच्या हाती लागला. त्यानंतर त्याला कर्मचाऱ्यांकडून मारहाण करतानाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला.

या घटनेनंतर पोलीस आयुक्त डी. के. ठाकूर यांनी त्या शिपायाला निलंबित करण्याचे आदेश दिले.तसेच कुमारला मारहाण करणाऱ्या व्यक्तींविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे.