दुर्दैवी ! आरोपीला उपचारासाठी घेऊन आलेल्या पोलिसाचा हृदयविकाराच्या झटक्याने रुग्णालयातच मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपीला उपचारासाठी केईएम रुग्णालयात घेऊन आलेल्या गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षातील एका पोलीस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. मुंबई येथे रविवारी (दि.23) सकाळी ही धक्कादायक घटना घडली. त्यांच्या निधनाने पोलीस दलात शोककळा पसरली आहे.

शैलेंद्र राजाराम धनावडे (वय 49) असे अंमलदाराचे नाव आहे. रविवारी सायंकाळी त्यांच्यावर भोईवाडा हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. मुंबई पोलीस सशस्त्र दल, नायगाव यांच्यातर्फे शासकीय इतमामात सलामी देण्यात आली.

प्राप्त माहितीनुसार, धनावडे हे रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे कर्तव्यावर हजर झाले. सकाळी 10 च्या सुमारास अन्य साथीदारांसोबत आरोपीला मेडिकलला घेऊन जाण्यासाठी ते निघाले. प्रवासात त्यांनी ॲसिडिटी झाल्यासारखे वाटत असल्याचे सांगितले होते. पुढे रुग्णालयात पोहोचताच जास्तच अस्वस्थ वाटू लागल्याने सहकाऱ्यांनी डॉक्टरांकडे तपासणी करून घेण्यास सांगितले. ते डॉक्टरांकडे गेले. त्यांनी डॉक्टरांना असह्य वाटत आहे मला औषध द्या, असे सांगितले. डॉक्टरांनी त्यांच्या उपचारास सुरुवात केली आणि ई.सी.जी. करत असतानाच ते खाली कोसळले. यातच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला. धनावडे हे पत्नी, मुलगा आणि मुलीसोबत परळ येथील महादेवाची वाडी गृहनिर्माण संस्था या कॉलनीत राहण्यास होते.