Video : लॉकडाऊनमध्ये पोलिसांची मनमानी ! गरीब फळवाल्याकडून सर्व फळं हिसकावून निघून गेले,व्हिडीओ व्हायरल

भुवनेश्वर : वृत्तसंस्था – वेगाने पसरत असलेल्या कोरोना संसर्गामुळे देश पुन्हा एकदा लॉकडाऊनकडे निघाला आहे. अनलॉक असूनही सक्ती लादली जात आहे. या दरम्यान, ओडिशाच्या ब्रह्मपुर जिल्ह्यात काही पोलीस कर्मचार्‍यांचा असा व्हिडिओ वायरल होत आहे, जो खाकीसाठी डाग ठरत आहे. सोशल मीडियावर वायरल होत असलेल्या या व्हिडिओत काही पोलीस कर्मचारी एका गरीब फळ विक्रेत्याची फळे हिसकावताना दिसत आहेत.

काय आहे व्हिडिओमध्ये
सायकलवर प्लास्टिकच्या ट्रेमध्ये ठेवलेली फळे गल्लोगल्लीत जाऊन एक व्यक्ती विकत होता. त्याच वेळी काही पोलीस कर्मचार्‍यांनी त्याला पकडले. सुरूवातीला ते त्याची चौकशी करताना दिसत आहेत. नंतर त्यांनी त्याची सर्व केळी हिसकावली आणि आपल्या जीपमध्ये ती ठेवून पोलीस निघून गेले. पोलीस केळी घेऊन गेल्यानंतर तो तिथेच धायमोकलून रडू लागला. घटनेच्या वेळी तिथेच जवळच्या टेरेसवरून अज्ञात व्यक्तीने हा घटनेचा सर्व व्हिडिओ बनवला, जो सध्या ट्विटरवर आणि फेसबुकवर वेगाने वायरल होत आहे.

जेव्हा पोलीस फ्री हँड होतात तेव्हा असे होते
असे म्हटले जाते की, हा केळेवाला कंटेन्मेंट झोनमध्ये केळी विकत होता. म्हणूनच पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली. पोलिसांनी त्याच्याकडून एक हजार रूपये सुद्धा वसूल केले होते. फेसबुकवर नवनीत मिश्रा नावाच्या एका युजरने हा व्हिडिओ पोस्ट करत लिहिले आहे की, जेव्हा पोलीस फ्री हँड असतात तेव्हा गरीब विके्रत्याची सर्व केळी हिसकावली जातात.