Pune : तरुणीवर अत्याचार करणारा पोलीस बडतर्फ

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – तरुणीस लग्नास नकार दिल्यानंतर देखील तिच्यासोबत जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवत तिला पोलिसांत तक्रार दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यास पोलिस खात्यातून बडतर्फ करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी दिले आहेत. शुभम गजानन मोहिते असे बडतर्फ करण्यात आलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे.

मोहिते हा मोटार परिवहन विभागात नेमणूकीस होता. त्यावेळी त्याने एका तरुणीला लग्नाची मागणी घातली होती. मात्र तरुणीने त्याला लग्न करण्यास नकार दिला होता. त्यानंतर शुभमने तिला तू माझ्याशी लग्न केले नाही तर मी तुला ठार करेल अशी धमकी दिली. त्यानंतर २०१७ मध्ये त्याने तरुणीला जबरदस्तीने फिरायला नेले. तसेच तिच्यासोबत शारिरीक संबंध निर्माण केले. त्यामुळे तरुणीने शुभमला लग्न करण्याचा तगादा लावला. मात्र, यानंतर त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली.

तसेच तक्रार दिली तर तरुणीच्या वडिलांसह बहिणीची सरकारी नोकरी घालवितो, अशी धमकी दिली. याप्रकरणी मोहितेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर मोहितेला निलंबीत करण्यात आले होते. विभागीय चाैकशीत त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्याने शिपाई शुभम मोहितेला पोलिस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.