पोलीसनामा इफेक्ट : प्रभाग क्र.22 मधील विठ्ठल तुपे पाटील उद्यान आणि कालव्याची केली स्वच्छता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – हडपसरमधील मगरपट्टा-मुंढवा (प्रभाग क्र.22) लक्ष्मी कॉलनी येथील स्व. विठ्ठलराव तुपे पाटील उद्यानाची दुरवस्था झाल्याचे वृत्त पोलीसनामामध्ये प्रसिद्ध झाले. त्याची दखल घेत स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने दुरुस्ती केली. प्रशासनाने तत्परतेने केलेल्या कामाबद्दल स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

लक्ष्मी कॉलनीमधील खासदार स्व. विठ्ठलराव तुपे पाटील उद्यानाची आणि परिसरातून वाहणाऱ्या मोठ्या आणि बेबी कालव्यावरील राडारोडा स्वच्छ करण्यात आला आहे. तसेच कालवा आणि उद्यान परिसरात राडारोडा टाकू नये, असे आवाहन आमदार चेतन तुपे, माजी उपमहापौर नीलेश मगर नगरसेवक बंडू गायकवाड, पूजा कोद्रे, हेमलता मगर, स्वीकृतनगरसेविका संजीवनी जाधव यांनी केले आहे.

माजी उपमहापौर नीलेश मगर म्हणाले की, कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. त्यामुळे नागरिकांनी स्वतःबरोबर इतरांच्या सुरक्षेसाठी मास्क वापरावे, सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग पाळावे, तसेच घर आणि परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येकाने सहकार्य करण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.