पोलीसनामा इफेक्ट : हडपसरमधील सोलापूर रस्ता झाला अतिक्रमणमुक्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   महापालिकेच्या अतिक्रमण विभागाला रविवारी सुटी असल्याने हडपसरमध्ये सोलापूर रस्त्यावर बाजार भरला, असे वृत्त पोलिनामामध्ये प्रसिद्ध झाले. त्याची दखल घेत पालिका प्रशासनाने सोमवारी कडक कारवाई करून सोलापूर रस्त्यावरील अतिक्रमणे हटविली. त्यामुळे वाहतुकीसाठी रस्ता खुला झाला. वाहनचालक आणि पादचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी हडपसरमधील सोलापूर रस्ता मोकळा झाल्याने समाधान व्यक्त केले. ही परिस्थिती अशीच राहिली पाहिजे. रविवारीसुद्धा पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे लक्ष असले पाहिजे, त्यासाठी काही अधिकारी-कर्मचारी रविवारी कार्यरत ठेवले पाहिजे, असा सल्लाही स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

हडपसरमधील सोलापूर रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा ठऱणारी अतिक्रमणे हटवावीत असा मागिल महिन्याभरापासून पोलिसनामामधून पाठपुरावा केला जात आहे. त्याची पालिका प्रशासनाने दखल घेऊन परवानाधारक फेरीवाले आणि पथारीवाल्यांना पिवळे पट्टे आखून दिले आहेत. त्यामध्ये व्यवसाय करावा, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असे सांगितले आहे. त्यामुळे फेरीवाले आणि पथारीवाल्यांनी आज पिवळ्या पट्ट्यामध्येच थांबून व्यवसाय सुरू केल्याचे दिसत होते.

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाबरोबर वाहतूक विभागाने वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर अशाच पद्धतीने कारवाई करण्याची गरज आहे. सोलापूर रस्त्यावरील गर्दीच्या ठिकाणच्या बसथांब्यावर रिक्षाचालक रिक्षा उभ्या करतात. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. तसेच बस बसथांब्यावर न थांबता रस्त्यात किंवा बसथांब्याच्या पाठीमागे उभी राहत असल्याने अपंग, ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यासाठी वाहतूक विभागाने वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे.