पोलीसनामा इफेक्ट : मगरपट्टा चौकातील वाहतुकीतील बदल फसला; मगरपट्टा चौकातील वाहतूक पुन्हा ‘जैसे थे’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मगरपट्टा चौकातील वाहतुकीतील बदलाचा बोजवारा उडाला. रुग्णवाहिका वाहतूककोंडत अडकल्यामुळे रुग्णांना मोठा त्रास झाल्याचे वृत्त पोलीसनामा मध्ये प्रसिद्ध झाले. त्याची तातडीने दखल घेत हडपसर वाहतूक विभागाने पुन्हा वाहतूक जैसे थी केली. त्यामुळे वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

मुंढवा मार्गे पुण्याकडे जाणारी वाहतूक मगरपट्टा चौकातील उड्डाण पुलावरून बंद केली होती. सर्व्हिस रस्ता अरुंद असल्याने मोठी वाहने बसत नव्हती, तसेच वाहनांचा फ्लो जास्त असल्याने वाहतूककोंडी होऊन ध्वनी आणि वायू प्रदूषणामुळे नागरिक कमालीचे त्रासले होते. तसेच मगरपट्टा चौकातून चंदननगरकडे जाणाऱ्या वाहनांना वैदूवाडी चौकातून टर्न घेण्यास सांगितले जात होते. मात्र, अनेक वाहनांनी चौकाच्या पुढे जाऊन छोट्या जागेतून वाहने वळविण्याचा प्रयत्न केल्याने वाहनांची खच्चून गर्दी झाली. वाहतूक सुरळीत होण्याऐवजी मनस्ताप सहन करावा लागल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या गेल्या. त्यातच माजी उपमहापौर निलेश मगर यांनीही तातडीने दखल घेत त्याविषयी आवाज उठवून नागरिकांच्या सोयीचे बदल करावेत, अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी पोलीसनामाशी बोलताना दिला होता.

मगर म्हणाले की, मगरपट्टा चौकात महापालिकेचे रुग्णालय आहे, तसेच अनेक खासगी रुग्णालये आहेत. त्यामुळे हा चौक यू टर्नसाठी बंद करता येणार नाही. यू टर्न बंद केला तर रुग्णवाहिकांमध्ये रुग्णांची तडफड होईल आणि त्यांचे खापर आम्हा लोकप्रतिनिधींच्या माथी मारले जाईल. त्यामुळे वाहतूक सुरळीत कऱण्यासाठीचे बदल करावेत. मात्र, नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

हडपसर वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक दादा चुडाप्पा म्हणाले की, पूर्वी वाहतूक होती, त्याप्रमाणेच सुरू राहील. तसेच पुढील नियोजनासाठीसाठी काही नसल्याचे त्यांनी सांगितले.