‘ती’ अट मागे घेण्याबाबत मुंबई पोलिसांचे मौन !

पोलिसनामा ऑनलाईन – नागरिकांनी दोन किलोमीटरच्या परिघातच खरेदी किंवा व्यायाम करावा, ही अट रद्द केल्याचे शासनाने शुक्रवारी स्पष्ट केले असले, तरी मुंबई पोलीस दलाकडून कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांमधला संभ्रम वाढण्याची शक्यता आहे.

शासनाने टप्प्याटप्प्याने लॉकडाउन शिथिल केले असून पोलिसांनी नागरिकांना घराजवळच खरेदी, व्यायाम करण्याचे आवाहन केले. मात्र 28 जूनला पहिल्यांदाच पोलिसांनी सोशल मीडियावरुन जारी केलेल्या आवाहनात दोन किलोमीटरच्या मर्यादेचा स्पष्ट उल्लेख केला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम वाढल आहे. लॉकडाउनमध्ये पोलिसांनी फौजदारी दंड संहितेतील कलम 144 चा आधार घेत काढलेल्या एकाही आदेशात नागरिकांचा संचार मर्यादित ठेवणारा नेमका परीघ किंवा अंतर मर्यादेचा उल्लेख नाही. विशेष म्हणजे दोनच दिवसांनी पोलिसांनी जारी केलेल्या आदेशातही दोन किलोमीटरऐवजी घराजवळील दुकाने, केशकर्तनालये, स्पा येथे जाण्यास नागरिकांना मुभा आहे, असा उल्लेख आहे. मात्र या आदेशात दोन दिवसांपूर्वी लादलेली दोन किलोमीटरची अट मागे घेतली, असे कुठेही नमूद नाही. याबाबत पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी प्रतिक्रिया देणे टाळले. नवनियुक्त पोलीस प्रवक्ते संग्रामसिंग निशाणदार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी 30 जूनचे आदेश आणि त्यातील घराजवळील या शब्दाकडे बोट दाखवले आहे.