तरुणीस डांबून ठेवून पोलीस पुत्राने केला बलात्कार 

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – इतरांना शिस्त लावताना आपल्याच मुलांना शिस्त लावण्यास पोलीस कमी पडत आहेत कि काय अशी चर्चा सध्या नाशिकमध्ये होत आहे. दोन दिवसांपूर्वी पोलीस मुख्यालयातील एका पोलिसाच्या मुलाला खंडणी उकळल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. हे प्रकरण ताजे असतानाचा आणखी एका पोलिसाच्या मुलाने लग्नास नकार दिल्याने तरुणीस डांबून ठेवून बलात्कार केल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पोलीस पुत्र फरार झाला आहे. या घटनेमुळे नाशिक पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

संतापजनक… शिक्षकाने केला अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार, विद्यार्थीनीला गेले दिवस 

भुषण नानासाहेब जाधव (रा. पोलिस मुख्यालय) असे संशयिताचे नाव आहे. सिडकोतील २० वर्षांची युवती आणि संशयीत एका ठिकाणी कामास होते. त्यातून दोघांमध्ये मैत्री झाल्याने ही घटना घडली. संशयिताने तरुणीकडे विवाहाची गळ घातली होती. गुरुवारी रात्री संशयिताने तरुणीस भेटण्यासाठी कॉलेजरोड परिसरातील किस्ट फायनान्स कंपनी परिसरात बोलविले होते. यावेळी तरुणी आपल्या मैत्रिणीस सोबत घेवून गेल्याने संशयिताचा पारा चढला. लग्नाचे कागदपत्र का आणले नाहीत, असे म्हणून त्याने युवतीस शिवीगाळ करीत मारहाण केली. हा वाद मैत्रीणीने मध्यस्थी करीत मिटविल्यानंतर संशयिताने युवतीस दवाखान्यात घेवून जात असल्याचे सांगितले. तसेच मैत्रीणीस घरी काढून दिले. संशयीत पिडीत युवतीस आडगाव शिवारातील निर्मलनगर येथे घेऊन गेला. येथे त्याने तिला डांबून ठेवले. यावेळी संशयिताने युवतीस शिवीगाळ करीत विष पाजून जीवे ठार मारण्याची धमकी देत बलात्कार केल्याचे तरुणीने आपल्या फिर्यादीत नमूद केले आहे. दरम्यान, गुन्हा दाखल होताच संशयीत पसार झाला असून, त्याचा पोलिस शोध घेत आहेत. या घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक चांदणी पाटील करीत आहेत.

दोन दिवसात पोलिस मुख्यालयातील दोन मुलांविरूध्द गंभीर गुन्हे दाखल झाले. नवरात्रीमध्येही या परिसरात दोन गटात हाणामारी झाली होती. मात्र, पोलिसांनी मध्यस्थी करीत हा प्रकार वाढू दिला नाही. पोलिस पुत्रांकडून सातत्याने होणाऱ्या गुन्ह्यांबाबत वरिष्ठ काय उपाययोजना करतात, याबाबत पोलीस दलातच चर्चा सुरू आहे.