नीती आयोगाकडून BMC चे कौतुक, म्हणाले – ‘कोरोना व्यवस्थापनाच मुंबई मॉडेल प्रेरणादायी’

मुंबईः पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना रुग्णांचा विस्फोट झालेल्या मुंबईतील परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाल्यानंतर परिस्थिती बिकट झाली होती. मात्र मुंबई महापालिकेकडून तातडीने उपाययोजना करण्यात आल्या. तसेच रुग्णांची हेळसांड थांबवण्यासाठी बेड, ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरसंदर्भातील वाटपात सुसूत्रता आणत महापालिकेने परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. मुंबईच्या ऑक्सिजन वितरण प्रणालीचे सर्वोच्च न्यायालयानेही कौतुक केले आहे. याची चर्चा सुरु असतानाच आता केंद्र सरकारच्या नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी कोरोना व्यवस्थापनाचे मुंबई मॉडेल प्रेरणादायी असल्याचे म्हणत महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांचे कौतुक केले आहे.

केंद्रीय पद्धतीने बेडच वाटप करणे, ऑक्सिजन साठवणुकीच्या सुविधांचा अंदाज घेणे, इतकेच नाही तर खासगी रुग्णालयातील बेडचेही वाटप आणि त्यावर देखरेख ठेवण्यासाठी डॅशबोर्ड तयार करणे, रुग्णांच्या तब्येतीबद्दल पाठपुरावा करण्यासाठी वॉर रुम निर्माण करणे हे मुंबई महापालिकेचे कोरोना व्यवस्थापन मॉडेल प्रेरणादायी आहे. महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि त्यांच्या ग्रेट टीमच अभिनंदन अशा शब्दात नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी कौतुक केले आहे. दरम्यान दिल्लीतील ऑक्सिजन तुटवड्यासंदर्भातील याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने मुंबईतील कोरोना व्यवस्थापन मॉडेलचा दाखला दिला होता. कोरोना व्यवस्थापनासंदर्भात मुंबई महापालिकेनं तयार केलेले मॉडेल देश आणि राज्यस्तरावर शक्य आहे का?अशी विचारणा न्यायालयाने केली होती.