‘वादग्रस्त’ उपसंचालक बाळासाहेब वानखेडे यांना राजकारण्यांचा राजाश्रय ?

पुणे  : पोलीसनामा ऑनलाईन – राज्याच्या इतिहासातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची सर्वात मोठी कारवाई पुण्यात करण्यात आली होती. या कारवाईमध्ये पावणे दोन कोटी रुपये घेताना अ‍ॅड.रोहिल शेंडे हा एसीबीच्या जाळ्यात सापडला होता. पण लाचलुचपत खात्याच्या तपासणीत असे आढळून आले की, शेंडे हा उपसंचालक बाळासाहेब वानखेडे यांच्यासाठी काम करत होता. म्हणूनच जागेचा निकाल लावल्या बरोबर त्याने दुसऱ्या वकिलाला पैसे घेऊन बंडगार्डन परिसरात बोलवले होते. एसीबीच्या पथकाने अ‍ॅड. शेंडे याला एक कोटी ७० लाखांची लाच घेताना अटक केली. या लाचेच्या रक्कमेत फक्त पाच लाखांच्या नोटा खऱ्या होत्या तर उर्वरित रक्कम कागदाच्या स्वरुपात होती.

बाळासाहेब वानखेडे यांच्या सेवानिवृत्तीची दोन वर्षे शिल्लक असल्यामुळे त्यांची पुणे येथे नियुक्ती करण्यात आली होती. त्यांची पुण्यात नियुक्ती करावी यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले होते. असे एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार समोर आले आहे. महसूल विभागाचा वानखेडे यांना भूमी अभिलेख विभागात नियुक्तीस सुरुवातीपासून प्रचंड विरोध होता. मात्र, रामदास आठवले यांच्या आग्रहामुळे वानखेडे यांना पुण्यात उपसंचालक या पदावर नियुक्ती मिळाली. ठाणे येथे असतानासुद्धा त्यांचा मानस पुत्र अ‍ॅड. शेंडे हा सुद्धा ठाण्यात तीन वर्षे काम करित होता. नियमाप्रमाणे उपसंचालक वानखेडे यांची बदली नागपूर आणि अमरावती येथे झालेली होती. परंतु त्यांची नियुक्ती पुण्यात करण्यात यावी यासाठी आठवले यांनी आग्रह धरला आणि तो मुख्यमंत्री कार्यालयाने मान्य केला.

लाचलुचपत खात्यानुसार अ‍ॅड. शेंडे याच्या संभाषणात वारंवार वानखेडे यांचा उल्लेख आला असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सुत्रांनी स्पष्ट केले आहे. तरीसुद्धी अधीक्षक संदिप दिवाण हे अधिकृतपणे बोलण्यास तयार नाहीत. जर एखाद्या प्रकरणात एवढ्या मोठ्या प्रमाणात लाच घेऊन हे अधिकारी निकाल देत असतील आणि फायलींना नियमात बसवत असतील तर त्यांच्या ठाणे आणि पुणे येथील निकालांचे ऑडिट किंवा तपासणी होणे गरजेचे आहे. शासनास किती मोठे नुकसान झाले आहे हे या प्रकरणावरुन सिद्ध होत आहे. आतातरी शासन जागे होणार का आणि असल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना शासन करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वच्छ भारताचे गोडवे गात असताना भाजप सरकारच्या कार्य़काळात एवढे मोठे मासे गळाला लागत आहेत. मुख्यमंत्री या प्रकरणात स्वत: लक्ष घालून याची पाळेमुळे खोदून काढतील काय अशी चर्चा जनमानसात होत आहे.

वानखेडे यांचा ‘गतिमान’ प्रवास

 

वानखेडे यांनी भूमी अभिलेख विभागाच्या उपसंचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर आपल्या ‘गतिमान’ कारभारची गती दाखवून दिली. त्यांच्या या गतिमान कारभारामुळे त्यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास पाटील यांनाही मागे टाकले आहे. दररोज वेगवेगळ्या फायली हातावेगळ्या करण्याची जादू त्यांच्या हातामध्ये असून या जादूमुळे ते कशा प्रकारे ‘गतिमान’ काम करतात याची अनुभुती महसूल विभागातील सर्वांनाच आली.

वानखेडेशी संबंध नाही :  आठवले
वानखेडे यांना भूमी अभिलेक विभागात नियुक्त करण्यासाठी शिफारस करणारे रामदास आठवले यांनी वानखेडे यांच्याशी आपला संबंध नसल्याचे सांगत हात झटकले आहेत. अनेक जण नियुक्ती किंवा बदलीसाठी आपल्याकेडे येत असतात. अशावेळी आपण त्यांना पत्र देत असतो. याचा अर्थ असा होत नाही की त्या व्यक्तीला आपण ओळखतो. असेच वानखेडे याच्या प्रकरणात घडले  असल्याचे आठवले यांनी सांगितले.