शरद पवारांनी ‘नेम’ धरला मुंबईत, भाजपचा ‘गेम’ झाला दिल्लीत !

मुंबईतील 'डावा'नं दिल्ली 'घायाळ'

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे पुन्हा सत्तेत आलेले देवेंद्र फडणवीस सरकार केवळ तीन दिवसात कोसळलं. तीन दिवसात सरकार कोसळल्याने भाजपची नाचक्की झाली. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी त्याचे पडसात दिल्लीतही उमटतील असे म्हटले. याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मुंबईच्या वारामुळे दिल्ली घायाळ झाली अशी परिस्थीती आहे.

देशामध्ये 2014 पासून भाजपची सत्ता आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या जोडीने लाथ मारले तिथे पाणी काढले. बिहार, गोवा, कर्नाटक राज्यांमध्ये सत्ता नसतानाही सत्ता डावपेच आखून या राज्यामध्ये भाजपची सत्ता आणली. मात्र राजस्थान, मध्य प्रदेशातील सत्ता गेली. राजस्थानमध्ये मोदींना विरोध नसल्याचे जनतेने लोकसभा निवडणुकीतही दाखवून दिले. हे सगळं भाजपला किंबहुना अमित शहांना महाराष्ट्रात मात्र करता आले नाही. याचा दूरगामी परिणाम दिल्लीच्या आणि देशाच्या राजकारणावर होणार हे स्पष्ट दिसत आहे. महाराष्ट्रासारखे महत्त्वाचे राज्य भाजपच्या हातून निसटल्याने भाजपच्या नेत्यांची झोप उडाली असणार. याला कारणीभूत ठरले ते शरद पवार. शरद पवारांनी राजकीय डावपेच आखत भाजपला सत्तेपासून दूर ठेवले.

भाजपने अजित पवारांवर विश्वसा कसा ठेवला ?
महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार यांचे त्यांच्या पक्षातून बंड करणे हे काही नवीन नाही. असे असतानाही देवेंद्र फडणवीस आणि भाजपने अजित पवार यांच्यावर ठेवलेला विश्वास कशाच्या जोरावर ठेवला याचे कोडं पडलंय. सत्तेच्या खुर्चीला चिकटून राहण्याचा मोह फडणवीस यांना आवरता आला नाही. त्यासाठी त्यांनी मिळेल ते खिशात घालण्याची तयारी केली असे तरी सध्याच्या घडामोडीवरून दिसून येत आहे.

भाजपने राज्यात सत्ता तर गमावलीच त्याखेरीज नागरिकांची सहानभूतीही गमावली. सत्ता स्थापनेच्या चर्चेत शिवसेनेने हट्टीपणा करत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. त्यावेळी भाजपला थोडी सहानुभूती होती. मात्र, अजित पवारांसोबत जाऊन गोळाबेरीज करण्याच्या नादात भाजपने स्वत:चे नुकसान करुन घेतले. जर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या पक्षांना सरळ सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा करून दिला असता तर कदाचित नागरिकांची सहानुभूती भाजपला मिळाली असती. मात्र, आता ती पुन्हा मिळवणे अवघड आहे. भाजपने सत्तेच्या लोभापायी चार दिवसात आपलीच माती करून घेतली.

Visit : Policenama.com