Pune : प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकर बेपत्ता होण्यामागे राजकीय कनेक्शन ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातील वाहन उद्योग क्षेत्रातील पाषाणकर ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक (Managing Director) गौतम पाषाणकर (Gautam Pashankar) हे गेल्या 8 दिवसांपासून बेपत्ता आहेत. अद्यापही त्यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. गौतम यांचे चिरंजीव कपिल पाषाणकर यांनी गौमत यांचं अपहरण झाल्याची शक्यता वर्तवली आहे. आता तर या संपूर्ण प्रकरणाला राजकीय वळण असल्याचंही बोललं जात आहे. वडिलांच्या अपहरणामागे राजकीय कनेक्शन असल्याचा आरोप मुलगा कपिल यांनी केला आहे.

कपिल पाषाणकर यांनी याबाबत पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी वडिल गौतम पाषाणकर यांच्या बेपत्ता होण्यामागे राजकीय व्यक्तीचा हात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. या राजकीय व्यक्तीची माहिती कपिल यांनी पुणे पोलीस आयुक्तांना दिली आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की, स्वत: ती राजकीय व्यक्ती नव्हे तर त्याच्याशी संबंधित व्यक्ती या प्रकरणात आहे. वडिलांनी ज्या काही आर्थिक अडचणी होत्या त्याची चौकशी केली, तेव्हा मागील 2-3 महिन्यांपासून नेमकं काय घडलं होतं ? वडिलांवर तणाव का होता ? त्यांच्या जवळच्या व्यक्तींकडून माहिती घेतली असता एक व्यक्ती सतत वडिलांना पैशांसाठी धमकावत असल्याचं कळालं. त्यानं वडिलांवर केसही केली होती असंही कपिल यांनी सांगितलं.

8 दिवसांपासून बेपत्ता

पुण्यातील वाहन उद्योग क्षेत्रातील पाषाणकर ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक गौतम पाषाणकर हे बुधवारी (दि 21) सायंकाळपासून बेपत्ता झाले आहेत. त्यानंतर त्यांची सुसाईट नोट सापडल्यानं खळबळ उडाल्याचं चित्र दिसून आलं. आता त्यांच्याबद्दल आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) रस्त्यावरील एका एटीएममधून (ATM) त्यांनी बेपत्ता होण्याआधी 5000 रुपये काढले होते. तसंच आपल्या फोनमधील सर्व डेटा डिलीट केला होता अशी माहिती आता पोलिसांनी दिली आहे.

बुधवारी सायंकाळपासून गौतम पाषाणकर बेपत्ता असल्यानं त्याचे पुत्र कपिल पाषाणकर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivajinagar Police Chowky) तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला होता. पोलीस तपासात गौतम पाषाणकर यांची सुसाईड नोट (Gautam Pashankar Suicide note) हाती लागली होती. व्यवसायातील आर्थिक नुकसानीमुळं आत्महत्या करत असल्याचं यात लिहिण्यात आलं होतं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी गौतम यांनी लोणी काळभोर येथे भेट दिली होती. त्यानंतर दुपारी 4 वाजताच्या सुमारास ते जंगली महाराज रोडवरील कार्यालयात गेले होते. त्यांच्या ड्रायव्हरनं अनेकदा कॉल करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचा फोन मात्र संपर्क क्षेत्राच्या बाहेर होता. यानंतर ड्रायव्हरनं गौतम यांचा मुलगा कपिल याच्याशी संपर्क साधला. कुटुंबीय गौतम यांना शोधण्यात अपयशी ठरल्यानंतर कपिल यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दिली.

You might also like