राजकीय धुरंधरांच्या नरसिंहपूर दौर्‍यामुळे तालुक्यात राजकीय चर्चेला उधाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी २०१९ मध्ये राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने, इंदापूर विधानसभा मतदार संघातुन निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे, काँग्रेसचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह अनेक मातब्बर नेत्यांच्या फेर्‍या या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कुलदैवत असलेले इंदापूर तालुक्यातील तिर्थक्षेत्र, श्रीक्षेत्र नरसिंहपूर या ठीकाणी वाढल्या आहेत. काँग्रेस पेक्षा राष्ट्रवादीकडे विधानसभा निवडणूकीसाठी इच्छुकांची गर्दी जास्त असल्याने आगामी विधानसभा निवडणूक ही इंदापूर तालुक्याच्या राजकारणातील नविन राजकीय समीकरणांची नांदी ठरणार का ? हाच प्रश्न सध्या इंदापूर तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे.

राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे आमदार झाल्यापासुन राज्यात सत्ता भाजपची असताना देखील कोट्यावधी रूपयांचा निधी इंदापूर तालुक्यात आणुन मोठ्या प्रमाणात विकासकामे चालु असल्याचे प्रत्येक कार्यक्रमातुन जनतेसमोर मांडत असतात. मी विरोधी पक्षाचा राष्ट्रवादीचा आमदार असुन देखील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व युतीतील अनेक मंत्री व नेत्यांशी आपले मित्रत्वाचे घनिष्ठ संबध असल्याने इंदापूर तालुक्याला निधी उपलब्ध होऊन मिळत असल्याचे दत्तात्रय भरणे हे कार्यक्रमामध्ये अनेकदा सांगत असतात. त्यातच मुख्यमंत्र्यांचे कुलदैवत असलेले श्रीक्षेत्र नरसिंहपूर तिर्थक्षेत्र विकासासाठी २७० कोटी रूपयांचा निधी मुख्यमंत्र्यांनी मंजूर करून मोठ्या प्रमाणात विकास सुरू असल्याने साहजिकच त्याचेही श्रेय भरणे यांनाच मिळत असल्याने दत्तात्रय भरणे यांची भाजपशी जवळीक अधिक वाढल्याची चर्चा इंदापूर तालुक्यात दबक्या आवाजात ऐकायला मिळत आहे.

तर राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मागील काही दिवसापूर्वी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थानी जावुन त्यांची भेठ घेतली होती. त्यावेळी नुतन जि. प. सदस्या कु. अंकिता पाटील यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पगुच्छ देवुन सत्कार केला होता. हर्षवर्धन पाटील यांनी मंत्रीपदाच्या काळात लिहीलेले ‘विधानगाथा’ या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबई येथे केले. त्या वेळी राष्ट्रवादीचे शरद पवार हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहीले होते. यावरून हर्षवर्धन पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चाही मोठ्या प्रमाणात रंगली होती. तर लोकसभेला इंदापूर तालुक्यात काँग्रेसने आघाडी धर्म पाळला असुन विधानसभेला राष्ट्रवादीने आघाडी धर्म पाळुन काँग्रेसला साथ द्यावी अन्यथा आम्ही वेगळा विचार करू असा सुर अनेकदा हर्षवर्धन पाटील यांच्याकडून कार्यक्रमांमधून ऐकावयास मिळत असल्याने आगामी विधानसभेला नविन राजकीय समिकरणे तयार होताना दिसून येत असल्याचे चित्र आहे.

इंदापूर तालुक्यातील निरा व भीमा नद्यांना महापूर येवून तालुक्यातील अनेक गावांवर जलसंकट ओढवले. तेथिल नागरिक रहिवाशांना जलसंकटाचा सामना करावा लागत असताना तालुक्यातील आजी-माजींसह मातब्बर नेतेमंडळींनी पुराच्या पाण्याखाली गेलेल्या नरसिंहपूर या गावाला भेट देवून तेथील पुर परिस्थितीचा आढावा घेत नागरिकांना मदतीचा हात देवून धीर दिला. होडीतुन फेरफटका मारल्याने तालुक्यातील जनतेचे कान मात्र टवकारल्याचे चित्र आहे. तालुक्यातील आनेक गावामध्ये पुरस्थिती निर्माण झाली असताना राजकीय नेतेमंडळीचा पुर नरसिंहपूरकडेच का ? याचे कोडे कोणालाच उलगडलेले नाही. परंतु आगामी विधानसभेच्या दृष्टीने पाहीले तर राजकीयदृष्ट्या दोन्ही नेते मंडळींची विधानसभा तिकीटासाठी चाललेली राजकीय कुरघोडी असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगू लागल्याने चर्चेला तालुक्यात उधान आले असुन नरसिंहपूर हेच आगामी विधानसभेच्या राजकीय समिकरणांची नांदी ठरते की काय याचीच चर्चा जानकारांमध्ये रंगू लागली आहे.

आरोग्यविषयक वृत्त